IND vs AUS Final: यंदाच्या वर्षी टीम इंडियाने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. यावेळी फायनल सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशील लढत द्यायची आहे. यामुळे सर्व चाहत्यांना 2003 साली झालेल्या वर्ल्डकपच्या फायनल सामन्याची आठवण झाली आहे. 2003 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला 125 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आलेत. भारत 2003 च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये हरला होता, पण यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने कोणत्या चुका करू नयेत हे पाहूया.
2003 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हर्समध्ये 2 बाद 359 रन्स केले होते. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माला या चुका टाळाव्या लागणार आहेत. त्यामुळे टॉस वेळी योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.
2003 साली झालेल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान, आशिष नेहरा आणि श्रीनाथ यांनी डेथ ओव्हर्समध्ये खूप रन्स दिले. त्यांच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि डॅमियन मार्टिन यांनी सहजासहजी मोठे फटके मारले. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांना त्यांच्या भूतकाळातील चुकांमधून शिकलं पाहिजे.
2003 चा वर्ल्डकप भारतीय गोलंदाजांसाठी दिवस निराशाजनक होता. ऑस्ट्रेलियाचे ओपनर मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी उत्तम सुरुवात केली. भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी तळमळत होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने डोंगराएवढी धावसंख्या उभारली होती. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमला ही चूक पुन्हा करायला आवडणार नाही.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. चाहत्यांच्या मनात टीम इंडिया 2003 चा बदला घेणार का हा प्रश्न आहे. तब्बल 12 वर्षांनंतर म्हणजेच 2011 नंतर टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्येच वर्ल्डकप जिंकला आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.