मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी आणि शेवटची वनडे शुक्रवार १८ जानेवारीला होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर दुसऱ्या मॅचमध्ये विजय झाला. त्यामुळे ३ वनडे मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत आहे. तिसरी वनडे जिंकणारी टीम सीरिजही खिशात टाकेल. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा या मॅचच्या आधीच्या दिवशी दोन्ही टीमनं कसून सराव केला. बीसीसीआयनं त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून भारतीय टीमच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी जोरदार सराव करताना दिसत आहे. तिसऱ्या वनडेआधी धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
.@msdhoni looking in great touch here at the nets session ahead of the 3rd and final ODI against Australia.
What's your prediction for the game? #AUSvIND pic.twitter.com/WLbZP78Lii
— BCCI (@BCCI) January 17, 2019
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं खास त्याच्या स्टाईलमध्ये भारताला जिंकवून दिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं सिक्स मारत भारताला विजयाजवळ पोहोचवलं आणि मग एक रन काढून भारताला जिंकवून दिलं. या मॅचमध्ये भारताचा ६ विकेट आणि ४ बॉल राखून विजय झाला. या मॅचमध्ये विराट कोहलीनं १०८ बॉलमध्ये १०४ रन केले. तर धोनीनं ५४ बॉलमध्ये नाबाद ५५ रनची खेळी केली. धोनीच्या या खेळीमध्ये २ सिक्सचा समावेश होता.
दुसऱ्या मॅचप्रमाणेच पहिल्या मॅचमध्येही धोनीनं अर्धशतक केलं होतं. पण पहिल्या मॅचमधल्या अर्धशतकानंतर धोनीवर टीका झाली होती. त्या मॅचमध्ये धोनीनं ९६ बॉलमध्ये ५१ रनची खेळी केली होती. धोनीच्या या संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका झाली होती. पहिल्या वनडेमध्ये भारताचा ३४ रननी पराभव झाला होता.
तिसरी वनडे ही भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली शेवटची मॅच आहे. ३ टी-२० मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत सुटली होती, कारण १ टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली. तर ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला होता. ऑस्ट्रेलियाची सीरिज संपल्यानंतर भारत लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे.