Sunil Gavaskar on Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा एकदिवसीय सामना (Ind vs Aus ODI Series) गमावत भारताने मालिकाही गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने 2-1 ने भारताचा पराभव केला. तिसऱ्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी पराभव करत घरच्या मैदानावर धूळ चारली. या पराभवानंतर माजी क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) खडे बोल सुनावले आहेत. रोहित शर्माने मेहुण्याच्या लग्नासाठी पहिल्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती घेतली होती. यावरुन सुनील गावसकर यांनी नाराजी जाहीर केली आहे.
वर्ल्ड कप तोंडावर असताना कुटुंबाप्रती असणाऱ्या आपल्या बांधिलकींना प्राधान्य देता कामा नये असं स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. जर खूपच एमर्जन्सी असेल तरच त्यासाठी वेळ द्यावा असं ते म्हणाले आहेत. रोहित शर्माने मेहुण्याच्या लग्नासाठी पहिल्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने संघाचं नेतृत्व केलं होतं. मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. बीसीसीआयने कसोटी संघ जाहीर करतानाच रोहित शर्मा वानखेडेमधील एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही असं जाहीर केलं होतं.
"मला वाटतं त्याने (रोहित शर्मा) प्रत्येक सामना खेळला पाहिजे. एका सामन्यासाठी उपलब्ध आहे आणि इतर सामन्यांसाठी नाही, असा कर्णधार असणं संघासाठी योग्य नाही. हे फार महत्त्वाचं आहे. हे कोणत्याही खेळाडूसोबत होऊ शकतं याची मला कल्पना आहे. ही एक कौटुंबिक बांधिलकी होती आणि त्यासाठी त्याने तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं हे मी समजू शकतो," असं गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले.
"पण जेव्हा वर्ल्ड कपचा प्रश्न येतो तेव्हा कौटुंबिक बांधिलकी तुमचं प्राधान्य असू शकत नाही. हे इतकं सोपं आहे. जर खूपच इमर्जन्सी असेल तर सर्व गोष्टी आधीच पूर्ण करुन घ्या. इमर्जन्सी असणं ही फार वेगळी गोष्ट आहे," असं सुनील गावसकर यांनी सांगितलं.
"नेतृत्व करताना त्यात सातत्य असलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाला आपल्या सोबत पुढे नेलं पाहिजे, अन्यथा दोन नेतृत्व तयार होतील. यानंतर संघात लक्ष घालणारे दोन कर्णधार तयार होतील," अशी भीती गावसकरांनी व्यक्त केली आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाच गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 10 गडी राखत पराभव केला. यामुळे चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडिअममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात 21 धावांनी पराभव झाल्यानंतर भारताने मालिकाही गमावली.