भारतीय क्रिकेटर संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसनने (Sanju Samson) बांगलादेशविरोधातील तिसऱ्या टी-20 सामन्यात आपल्या सर्वोत्तम खेळीची नोंद केली आहे. शनिवारी झालेल्या या सामन्यात संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांनी अक्षरश: घाम फोडला. सॅमसनने आपल्या पहिल्या शतकाची नोंद करताना, कमी चेंडूत तीन अंक धावा करणारा दुसऱा भारतीय फलंदाज ठरला आहे. पण फलंदाजी करताना संजू सॅमसनला कोणत्याही रेकॉर्डची फिकीर नव्हती. संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीचा वेग कमी करण्यास नकार दिला. 90 धावांवर असतानाही तो त्याच आक्रमकतेने फलंदाजी करत होता. आपल्याला गवसलेला सूर जाऊ नये यासाठी त्याने शतक जवळ आल्याची चिंता केली नाही.
बीसीसीआयने सामन्यानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सामन्यानंतरच्या या व्हिडीओत संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी दोघेही खेळीदरम्यान नेमक्या काय भावना होत्या याबद्दल सांगितलं. "खरं तर मी फार आनंदी आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी फार भावूक झालो असून, जे झालं त्याबद्दल देवाचा आभारी आहे. प्रत्येकाची वेळ येत असते," असं संजू सॅमसन सांगतो.
संजू सॅमसनने यावेळी शतक करणं फार मोठं आणि आव्हानात्मक होतं, पण मी तीन अंकी धावसंख्या गाठेन यावर विश्वास होता असंही संजू सॅमसनने सांगितलं. "मी माझं काम करत राहिलो. माझ्यावर विश्वास ठेवत होतो. ते शतक साजरं करताना तिथे माझ्यासह तू होता याचा मला आनंद आहे," असं संजूने सांगितलं. सूर्यकुमारनेही यावेळी आपण दुसऱ्या बाजूला उभं राहून याचा आनंद घेतला. मी पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी हे एक होतं असं सांगितलं.
सूर्यकुमारने यावेळी 90 धावांवर असतानाही आक्रमक फलंदाजी केल्याबद्दल संजूला विचारला. "तू 96, 97 धावांवर असतानाही रिस्क घेत होतास, नेमकं तुझ्या डोक्यात काय होतं?", असं सूर्यकुमारने संजूला विचारलं.
यावर उत्तर देताना संजूने सांगितलं की, "आपण गेल्या काही आठवड्यांपासून संघात एक वातावरण तयार केलं आहे. आक्रमक आणि नम्र राहा असाच आपल्याला संदेश आहे. आपला कर्णधार आणि प्रशिक्षक हेच दोन शब्द सातत्याने सांगत आठवण करुन देत आहेत. ते माझ्या स्वभावाला, माझ्या चारित्र्याला साजेसे आहे, म्हणून मी त्यासाठी पुढे जात राहिलो".
संजूने यावेळी खुलासा केला की, सूर्यकुमार यादवने त्याला 96 धावांवर असताना थोडं धीम्या गतीने खेळण्याचा सल्ला दिला. पण यावेळी त्याच्या डोक्यात मात्र वेगळ्याच गोष्टी होत्या. "मी 96 धावांवर असताना सूर्यकुमारला सांगितलं की, मी फटका मारणार आहे. त्यावर सूर्याने मला तू हे कमावलं आहेस त्यामुळे धीम्या गतीने खेळ असा सल्ला दिला. मला सूर्यकुमार आणि गौतम भाई यांच्याकडून जी स्पष्टता मिळाली त्याबद्दल आभारी आहे. त्यांनी मला आक्रमकतेने खेळण्यास आणि नम्र राहण्यास सांगितलं आहे. ते मला साजेसं आहे," असं संजू म्हणाला.