India vs NZ: अख्खा संघ ढेपाळला तरी बुमराहने किल्ला लढवला; रक्तबंबाळ असतानाही केली गोलंदाजी

India vs New Zealand: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असतानाही गोलंदाजी करत होता. बोटातून रक्त येत असतानाही तो पुढच्या ओव्हरला आला आणि आपला स्पेल पूर्ण करुन गेला.   

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2024, 02:41 PM IST
India vs NZ: अख्खा संघ ढेपाळला तरी बुमराहने किल्ला लढवला; रक्तबंबाळ असतानाही केली गोलंदाजी title=

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे. यादरम्यान भारतीय व्यवस्थापनाच्या चिंता वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह जखमी झाला असून, त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघ ढेपाळल्यानंतर न्यूझीलंडने 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान भारताने चांगली कामगिरी करत साम्यात पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे बुमराह जखमी असतानाही गोलंदाजी करत आहे. 

लंचनंतर सामन्याच्या 86 व्या ओव्हरमध्ये हे घडलं. भारतीय संघाचा फिजिओ मैदानावर धावताना दिसला. यावेळी भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर समालोचन करत होते. त्यांनी प्रेक्षकांना जसप्रीत बुमराहच्या बोटाला दुखापत झाली असून, रक्तस्राव होत असल्याची माहिती दिली. दुखापतीमुळे वेदना होत असतानाही बुमराहने गोलंदाजी थांबवली नाही आणि ओव्हर पूर्ण केली. यानंतर बोटाला पट्टी लावून त्याने आपला स्पेल पूर्ण करत धैर्य दाखवलं. 

पहिल्या डावात फक्त 46 धावांमध्ये गाशा गुंडाळलेल्या यजमानांनी घरच्या मैदानावर त्यांची आतापर्यंतची निचांकी धावसंख्या नोंदवली आहे. पण तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध निश्चित योजना घेऊन मैदानात उतरल्याचं दिसत होतं. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडने 134 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 15 षटकांत चार विकेट घेतल्या. भारत भारत 200 पेक्षा कमी धावात न्यूझीलंड संघाला तंबूत पाठवेल असं वाटत होतं. 

पण माजी कर्णधार टीम साऊथी आणि रचिन रवींद्र यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची निराशा झाली. न्यूझीलंडने 300 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे, जी भारताविरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात मोठी आहे. याउलट, भारताने 16 वर्षांतील घरच्या मैदानावर त्यांची सर्वात मोठी आघाडी स्वीकारली, 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या 448 धावांची त्यांची सर्वात वाईट आघाडी होती.