नवी दिल्ली : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांच्यावरील निलंबन हटवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून घेण्यात आला. गुरुवारी एका पत्रकाद्वारे त्यांनी याविषयीची माहिती दिली. निलंबन हटवण्यात आल्यानंतर आता पांड्या भारतीय संघासोबत न्यूझीलंडमध्ये सुरू असणाऱ्या सामन्यांमध्ये खेळू शकेल, तर राहुल इंडिया A कडून खेळणार आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ समितीकडून हा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे हार्दिक न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघात सहभागी होईल. तर, राहुल तिरुवअनंतपूरम येथे खेळवल्या जाणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटच्या तीन सामन्यांमध्ये इंडिया A कडून खेळताना दिसेल. इंग्लंड लायन्सविरोधात हे सामने होणार आहेत.
The Committee of Administrators (CoA) कडून या दोन्ही खेळाडूंवरील बंदी उठवल्यानंतर बीसीसीआयनेही तातडीने त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून या दोन्ही खेळाडूंविषयीच्या बऱ्याच संमिश्र चर्चा क्रीडाविश्वापासून चाहत्यांच्या वर्तुळातही पाहायला मिळाल्या होत्या.
निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. गप्पांच्या ओघात या दोघांकडूनही अशी काही वक्तव्यं केली गेली जी पाहता त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला. परिणामी त्यांची क्रिकेट कारकीर्दही अडचणीत आली होती. पण, आता निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे एक प्रकारचा दिलासाच त्यांना मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.