कधीकाळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या यशस्वीने ₹48000/Sq-ft रेटने घेतलं नवं घर; किंमत..

Yashasvi Jaiswal New Home: 2011 मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला मुंबईमध्ये सुरुवातीच्या स्ट्रगच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2024, 01:02 PM IST
कधीकाळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या यशस्वीने ₹48000/Sq-ft रेटने घेतलं नवं घर; किंमत.. title=
स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची कागदोपत्री पूर्तता जानेवरीतच केली

Yashasvi Jaiswal New Home: भारतीय संघातील तरुण फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सुरु असलेल्या मालिकेमध्ये त्याने 2 द्विशतकं झळकावली आहेत. एकीकडे मैदानावर दमदार कामगिरी करत असतानाच खासगी आयुष्यातही जैस्वालनेही एक स्वप्नवत कामगिरी केली आहे. यशस्वी जैस्वाल आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाला असून त्याने नवीन घर घेतलं आहे.

जैस्वालने कुठे घेतलं हे घर?

वांद्रे पूर्व येथे यशस्वी जैस्वालने 5 कोटी 38 लाख रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचा एकूण एरिया 1110 स्वेअर फुटांचा आहे. ही इमारत अंडर कंस्ट्रक्शन असून लवकरच तिचं काम पूर्ण होणार आहे. 7 जानेवारी रोजी यशस्वी जैस्वालने या घरासाठीचं स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसंदर्भातील कागदोपत्री पूर्तता केल्याची माहिती समोर आली आहे. प्रति स्वेअर फूटासाठी 48 हजार रुपये दराने यशस्वीने हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

वेगाने विकसित होणारा परिसर

मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी मुंबईत वांद्रे पश्चिमेस वास्तव्यास आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून वांद्रे पूर्वचा भागातही वेगाने गृहप्रकल्प आणि कॉर्परेट ऑफिस सुरु झाली आहेत. खास करुन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसराच्या आजूबाजूला मोठ्या झपाट्याने विकास होत असल्याने वांद्रे पूर्वेतील इमारतींनाही चांगलाच भाव मिळत आहे. याच भागात यशस्वी जैलस्वालने नवीन घर खरेदी केलं आहे.

झोपडपट्टी ते कोट्यवधीचा फ्लॅट

आज यशस्वी जैस्वाल कोट्यवधीच्या फ्लॅटचा मालक झाला असला तरी सुरुवातीच्या काळात त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिलांचे एक दुकान होतं पण कुटुंबातील 2 मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतकेही यशस्वीच्या वडिलांचे उत्पन्न नव्हते. मात्र अशा परिस्थितीतही आपल्याला क्रिकेटपटू व्हायचेय असं यशस्वीने लहानपणीच ठरवलं होतं. आपलं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वीने क्रिकेटची पंढरी म्हणजेच मुंबई गाठली. 2011 मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी वडिलांना मदतही केली. यशस्वी अनेकदा आझाद मैदानाबाहेर पाणीपुरीवाल्यांबरोबर निवांत वेळी उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना पाणीपुरी विकायला स्टॉलवाल्यांना मदत करायचा. मात्र त्यामधूनच यशस्वी पाणीपुरी विकायचा असा दावा केला जाऊ लागला. पण तो पाणीपुरी स्टॉलवर उभा असलायचा तरी पाणीपुरी विक्रीचा त्याच्या वडिलांचा व्यवसाय नव्हता असं यशस्वीच्या प्रशिक्षकांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. मात्र सुरुवातीचा काळ यशस्वीने मुंबईतील झोपडपट्टीत राहून काढला हे खरं आहे.

...अन् यशस्वीचं नशीब पालटलं

2013 मध्ये प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यशस्वीमधील क्रिकेटचं कौशल्य ओळखून त्याला पाठबळ दिले. ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने क्रिकेट कारकीर्दीची खरी सुरुवात झाली. आयुष्यात कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट खेळायला मिळेल की नाही अशी शंका कायम मुंबईतील झोपडपट्टीत राहताना यशस्वीच्या मनात यायची. 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने 2 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत यशस्वीला आपल्या संघात घेतले आणि तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

आयसीसीच्या रँकिंगमध्येही झेप

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग 2 द्विशतकं झळकावल्याने 'आयसीसी'च्या कसोटी रँकिंगमध्ये जैस्वालने 14 स्थानांनी झेप घेतली आहे. तो फलंदाजाच्या यादीमध्ये आता 29 वरुन थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. जैस्वालने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये 209 धावा केल्या होत्या. तर राजकोटच्या दुसऱ्या डावामध्ये नाबाद 214 धावांची खेळी केलेली. भारतीय संघाने सध्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये 2-1 ची आघाडी घेतली आहे.