Indian Cricket Team Head Coach Appointment: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखती 18 जून रोजी पार पडल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि डब्लू. व्ही. रमण या दोघांनीच भारतीय प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. दोघांचीही प्रत्येकी 40 मिनिटं मुलाखत घेण्यात आली. क्रिकेट सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. भारताच्या या दोन्ही माजी सलामीवीरांनी समितीला समाधानकारक उत्तरं दिली. ही मुलाखत घेण्याचं काम अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुल्केशना नाईक यांनी केलं. झूम कॉलवरुन या मुलाखती पार पडल्या. गंभीर आणि रमण या दोघांनीही डिजीटल माध्यमातून मुलाखतीला प्राधान्य दिल्याने ही विशेष मूभा देण्यात आलेली.
क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले मल्होत्रा यांनी या मुलाखतींमध्ये सक्रीय सहभाग घेतला. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गंभीरकडेच ही जबाबदारी सोपवली जाण्याची अधिक शक्यता आहे. बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा होण्याआधी यावर सविस्तर चर्चा केली जाईल अशी माहिती मिळत आहे. "गंभीरने क्रिकेट सल्लागार समितीला मुलाकत दिली आहे. चर्चेची एक फेरी आज झाली आहे. दुसरी फेरी उद्या (गुरुवारी) होईल," अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला बुधवारी दिली. पुढील तीन वर्षांचा विचार करुन सध्या भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. या काळात सर्वच प्रकारच्या आयसीसीच्या स्पर्धा होणार असल्याने ही नियुक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे पुढील 3 वर्षांसाठी संघाच्या दृष्टीने तुमचे विचार काय आहेत? असं दोघांनाही विचारण्यात आलं. त्यावर दोघांनीही सविस्तर उत्तर दिलं.
क्रिकेट सल्लागार समितीने गंभीर आणि रमण यांना फार महत्त्वाचे प्रश्न विचारले. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ तयार करण्यासंदर्भातील प्रश्न त्यामध्ये होता. यावर दोघांनीही समाधानकारक उत्तरं दिली. भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमीसारखे स्टार क्रिकेटपटू त्यांच्या करिअरच्या उत्तरार्धात असल्याने भारतीय क्रिकेटसाठी हा मोठा बदलाचा काळ ठरणार असल्याने त्यासंदर्भातही प्रश्न केले गेले. आधी गंभीरची मुलाखत झाली त्यानंतर रमण यांनी झूम कॉलवरुन मुलाखत दिली. "रमण यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटच्या वाटचालीसंदर्भातील त्यांचा दृष्टीकोन मांडला. ही मुलाखत 40 मिनिटं चालली. यामध्ये समितीने काही महत्त्वाचे प्रश्न विचारले," असं सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.
आयसीसी स्पर्धांचे जेतेपद पटकावण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात गंभीर आणि रमण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या दोघांनी आपआपली प्रेझेंटेशन्स दिली. आगामी काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जुलै 2024 ते नोव्हेंबर 2027 दरम्यान होणार आहे. गंभीरने कोलकात्याच्या संघाला यंदाचं आयपीएलचं पर्व जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गंभीरची नियुक्ती ही द्रविडच्या नियुक्तीपेक्षा वेगळी ठरणार आहे. यामागील कारण म्हणजे द्रविड हा टप्प्याटप्प्यात पुढे येत प्रशिक्षक झाला. त्याने आधी 19 वर्षांखालील संघ, भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिलं होतं. मात्र 2019 मध्ये निवृत्त झालेल्या गंभीरला थेट हे पद मिळणार आहे.