दुबई : १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्याआधी चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. सुरेश रैनानंतर आता हरभजन सिंगनेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण आयपीएल खेळणार नसल्याचं हरभजनने सांगितलं आहे. हरभजनने आजच टीमला याबाबतची माहिती दिली आहे. हरभजन आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं आधीपासूनच बोललं जात होतं, पण याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. आज मात्र हरभजन खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं.
चेन्नईच्या टीमचे दोन खेळाडू आणि काही सपोर्ट स्टाफ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. रैनाने माघार घेतल्यानंतर मोठा वाद झाला होता. चेन्नईच्या टीमचे मालक एन.श्रीनिवासन यांनी रैनावर टीका केली होती. हा वाद संपत नाही तोच आता हरभजननेही हा मोसम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मागच्या मोसमात हरभजनने चेन्नईकडून खेळताना शानदार बॉलिंग करत १६ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरभजन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये मलिंगाने सर्वाधिक १७० विकेट, अमित मिश्राने १५७ विकेट आणि हरभजनने १५० विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत सुरेश रैना, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगा यांनी यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे.