IPL 2023 Finals Sachin Tendulkar On Shubhman Gill: इंडियन प्रमिअर लिगच्या यंदाच्या पर्वातील (IPL 2023) अंतिम सामना नियोजित दिवशी म्हणजेच 28 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. मात्र तुफान पावसामुळे एकही चेंडू खेळवता न आल्याने सामना राखीव दिवशी म्हणजेच आज (29 मे रोजी) खेळवण्यात येणार आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जदरम्यानचा (CSK vs GT) हा सामना आज होणार की नाही हे पावसावर अवलंबून आहे. सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला असला तरी चाहते हा सामना पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. तशीच उत्सुकता भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरलाही लागून राहिलेली आहे. सचिनने अंतिम सामन्याआधी केलेल्या एका पोस्टमध्ये गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शुभमनच्या फलंदाजीचं तोंडभरुन कौतुक करताना त्याच्यातील कोणते गुण आपल्याला भावले याबद्दल सचिनने भाष्य केलं आहे.
सचिनने क्वालिफायर-2 मध्ये शुभमनने केलेल्या शतकी खेळीचं कौतुक केलं आहे. सचिनने शुभमनचा बॅट उचावतानाचा फोटो आणि आयपीएलच्या चषकाबरोबरचा गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या तसेच चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा फोटो पोस्ट केला आहे. "शुभमन गिलची यंदाच्या पर्वातील कामगिरी ही अविस्मरणीय आहे. 2 शतकांचा समावेश असलेला सामना फारच प्रभावी ठरला. एका शतकाने मुंबई इंडियन्सच्या अपेक्षा वाढवल्या. तर दुसऱ्याने ते अपेक्षा चिरडून टाकल्या. क्रिकेट हा खेळच असा अंदाज न व्यक्त करता येण्याजोगा आहे," असं सचिनने शुभमनाला टॅग करत म्हटलं आहे.
तसेच सचिनने, "शुभमनच्या फलंदाजीमधील ज्या गोष्टीने मी प्रभावित झालो ती म्हणजे त्याची उत्तम इच्छाशक्ती, शांतपणा आणि धावांसाठीची भूक. तसेच त्याची विकेट्सदरम्यान धावण्याची गतीही फारच उत्तम आहे," असंही म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, "जास्त धावा असलेल्या सामन्यांमध्ये अनेकदा असे क्षण येतात की ते सामन्याच्या निकालासाठी निर्णायक ठरतात. 12 व्या ओव्हरनंतर शुभमनने धावगती वाढवल्याने गुजरात टायटन्सला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याने आपली क्षमता दाखवून देत या सामन्यावर आपली छाप उमटवली. अशाचप्रकारे तिलकने मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर 24 धावा काढत नवीन उमेद मिळवून दिली ती अगदी सुर्यकुमार यादव बाद होईपर्यंत टिकून होती," असं सचिनने मुंबई विरुद्ध गुजरातदरम्यान खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर-2 चं विश्लेषण करताना म्हटलं आहे.
चेन्नईच्या संघाबद्दलही सचिनने भाष्य केलं आहे. "गुजरातचा संघ हा फार भक्कम आहे. गिल, हार्दिक आणि मिलरच्या विकेट्स चेन्नई सुपर किंग्जसाठी महत्त्वाच्या ठरतील. चेन्नईच्या संघामध्ये अगदी तळापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. धोनी अगदी आठव्या क्रमांकावरही फलंदाजीला येतो. त्यामुळेच दोन्ही संघांचा अटीतटीचा सामना होईल. हा अंतिम सामना फारच रंजक आणि पाहण्यासारखा होईल," असं सचिनने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
दरम्यान, आजही अहमदाबादमध्ये पाऊस पडत राहिला आणि एकही चेंडू खेळवण्यात आला नाही तर गुजरातच्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. साखळी फेरीतील 70 सामन्यामध्ये पॉइण्ट्स टेबलमध्ये गुजरातचा संघ अव्वल स्थानी असल्याने त्यांना जेतेपद प्रदान केलं जाईल.