IPL 2023: आयपीएल चषक (IPL Trophy) जिंकण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं आहे. गुजरात संघाने केलेल्या पराभवामुळे बंगळुरु संघाचं प्ले-ऑफमधील स्थान संपुष्टात आलं. गुजरात संघाकडून शुभमन गिलने सलग दुसरं शतक ठोकत बंगळुरुचा अत्यंत सहजपणे पराभव केला. गुजरातने सहा गडी राखत हा सामना जिंकला. या पराभवासह बंगळुरुचा आयपीएलमधील प्रवासही संपला. यानंतर बंगळुरुच्या चाहत्यांसह अनेक क्रिकेटप्रेमी भावनिक झाले होते. याचं कारण होता विराट कोहली.
या हंगामात पुन्हा एकदा विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. गुजरातविरोधात (Gujarat Titans) झालेल्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलमधील आठवं शतक ठोकलं. विराट कोहलीने एकीकडे बंगळुरुला प्ले-ऑफमध्ये नेण्यासाठी कडवी झुंज दिली असताना संघ मात्र अपेक्षित खेळी करु शकला नाही. विराटचे प्रयत्न वाया गेल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजी जाहीर करत भावनिक झाले होते.
दरम्यान बंगळुरु संघ बाहेर पडल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. विराट कोहलीने आता बंगळुरु संघ सोडून दिल्ली कॅपिटल्स संघातून खेळावं असं मत त्याने मांडलं आहे. पीटरसनने ट्वीट करत हा सल्ला दिला आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की "विराटने आता राजधानीकडून खेळण्याची वेळ आली आहे".
Time for VIRAT to make the move to the capital city…! #IPL
— Kevin Pietersen (@KP24) May 22, 2023
पीटरसनच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियाव प्रतिक्रियांचा पूरच आला आहे. बंगळुरु तसंच विराट कोहलीच्या चाहत्यांनीही यावर आपली मतं मांडली आहेत. अनेकांनी विराट कोहली कधीच बंगळुरु संघ सोडणार नाही असं म्हटलं आहे. तर काहींनी आता त्याने निर्णय घ्यावा असं मत मांडलं आहे.
Ain't happening ever. Kohli can never be the one who would leave RCB just for trophy.
— Pari (@BluntIndianGal) May 22, 2023
महत्त्वाचं म्हणजे, विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली तेव्हाच दिल्ली संघ विराट कोहलीला लिलावात खरेदी करणार होता. पण बंगळुरु संघाने विराटवर जास्त बोली लावत आपल्या संघात घेतलं आणि तेव्हापासून तो बंगळुरु संघाचाच भाग आहे.
Don’t think he will move out of RCB but if that happens, then Virat might want to be in CSK to continue his IPL journey under his forever Captain Dhoni.
— Trilok Reddy (@3lok_cricketfan) May 22, 2023
गुजरातविरोधातील सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास, विराट कोहलीने 61 चेंडूत 101 धावा ठोकल्या होत्या. विराटने केलेल्या तुफानी खेळीनंतर धावसंख्या 197 वर 5 गडी बाद झाली होती. पण शुभमन गिलने 52 चेंडूत 104 धावा करत बंगळुरुचा अत्यंत सहजपणे पराभव केला. आपण विराटच्या तोडीचे फलंदाज आहोत हे शुभमनने दाखवून दिलं आहे.
He should do it asap !
— NK (@Enigmatic__24) May 22, 2023
या सामन्यानंतर गुजरात संघ 20 गुणांसह पहिल्या स्थानावर आला. तर चेन्नई 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे लखनऊ आणि मुंबई संघ आहे. जर बंगळुरुने गुजरातचा पराभव केला असता तर मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. हैदराबादचा पराभव केल्याने मुंबई संघ 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.