Marcus Stoinis On Australian National Contract List: तो आला, त्याने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं काही... या अशाच शब्दांमध्ये मंगळवारी चेपॉकच्या मैदानात पाहायला मिळालेल्या मार्कस स्टॉयनिसच्या खेळीचं वर्णन करता येईल. इंडियन प्रिमिअर लीगच्या 39 व्या सामन्यात 210 धावांचा डोंगर उभारुनही चेन्नई सुपर किंग्जच्या हाती निराशाच लागली. मार्कस स्टॉयनिसने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर 3 बॉल 6 विकेट्स राखून लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने स्पर्धेमधील आपला पाचव्या विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर अगदी जिंकलेला कर्णधार म्हणजेच के. एल. राहुल असो किंवा पराभूत झालेला चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असो सर्वांच्या तोंडी मार्कस स्टॉयनिसचं नाव होतं. मात्र आपल्या दमदार खेळीच्या जोरावर शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना अवघ्या 3 बॉलमध्ये 17 धावा कुटणाऱ्या शतकवीर मार्कस स्टॉयनिसने सामन्यानंतर केलेलं एक विधान अनेकांचं मन जिंकून गेलं.
चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 210 धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊच्या संघाला पहिला धक्का संघाने स्कोअरबोर्डवर भोपाळाही फोडला नव्हता तेव्हा बसला. डावातील तिसऱ्या बॉलवर लखनऊचा सलामीवीर क्विंटन डीकॉक बोल्ड झाला. यानंतर मैदानात आलेला मार्कस स्टॉयनिसने अगदी नाबाद राहात 210 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. एकट्या मार्कस स्टॉयनिसने 211 च्या लक्ष्यापैकी नाबाद 124 धावा केल्या. के. एल. राहुल, देवदत्त पडिकल, निकोलस पुरन आणि दिपक हुडाच्या मदतीने मार्कस स्टॉयनिसने लखनऊला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.
मार्कस स्टॉयनिसने 63 बॉलमध्ये नाबाद 124 धावांची खेळी करताना 13 चौकार आणि 6 षटकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ 19 बॉलमध्ये 88 धावा चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून केल्या. स्टॉनिसने शेवटच्या ओव्हरमध्ये 6,4,4,4 अशी फटकेबाजी करत सामना जिंकवून दिला. या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक फलंदाजाने आपल्या भावना व्यक्त करताना केलेलं एक विधान अनेकांचं मन जिंकून गेलं. स्टॉयनिस काय बोलला हे जाणून घेण्याआधी त्याच्याबद्दल दोन्ही कॅप्टन्सने काय म्हटलं आहे जाणून घेऊयात.
नक्की वाचा >> CSK Top 4 मधून Out! 'हा' संघ Playoffs च्या उंबरठ्यावर; मुंबईची स्थिती बिकट, पाहा IPL Points Table
ऋतुराजने तोंडचा विजयाचा घास हिरवून नेणार्या स्टॉयनिसच्या फलंदाजीचं कौतुक केलं. "हा पराभव पचवायला कठीण आहे. मात्र येथे क्रिकेटचा एक उत्तम सामना पाहायला मिळाला. एलएसजीने सामन्याच्या शेवटला फार उत्तम खेळ केला. अगदी 13 व्या आणि 14 व्या ओव्हरपर्यंत सामना आमच्या हातात होता. मात्र स्टॉयनिस एकदम भन्नाट खेळी खेळला. दवामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. मैदानात दवं मोठ्याप्रमाणात होतं. त्यामुळे आमच्या फिरकी गोलंदाजांना विशेष प्रभाव पाडता आला नाही," असं ऋतुराज म्हणाला.
MARCUS STOINIS, THE HERO...!!!
6,4,4,4 in the 20th over by Stoinis when they needed 17 runs in the final over. pic.twitter.com/n7ko52XfC1
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2024
तर दुसरीकडे लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने, "हा विजय फारच खास आहे. विशेष करुन अशा सामन्यांमध्ये विजय मिळतो तेव्हा तो अधिक खास होतो. आम्ही फलंदाजी करत असताना फारच पिछाडीवर होतो. अगदी विशेष कामगिरी करत आम्ही हा विजय मिळवला आहे. हा सामना म्हणजे दोन्ही संघांसाठी नव्याने शुन्यापासून केलेली सुरुवात होती. येथील परिस्थिती वेगळी होती. त्यांनी अगदी उत्तम सुरुवात केली आणि आमच्यावर दबाव निर्माण केला. मात्र याचं सारं श्रेय स्टॉयनिसला जातं," असं म्हटलं.
नक्की पाहा >> 6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय
या सामन्यातील खेळीसाठी स्टॉयनिसला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना स्टॉयनिसने, "या स्पर्धेमध्ये माझ्याहून अनेक उत्तम सलामीवीर आहेत. त्यामुळे मी आजच्या खेळीबद्दल फारचं बोलणार नाही. मात्र केवळ फटकेबाजी करण्याचा आमचा विचार नव्हता. काही गोलंदाजांना आम्ही लक्ष्य करणार होतो. तर काही गोलंजादांबद्दल आम्ही अधिक दक्ष होतो, असं म्हटलं.
मार्कस स्टॉयनिसला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने नव्या वर्षासाठी करारबद्ध केलेलं नाही. मार्कस स्टॉयनिसचा समावेश करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत नाहीत. यासंदर्भात त्याने चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर एक भारावून टाकणारं विधान केलं. "ऑस्ट्रेलियन बोर्डाने माझा राष्ट्रीय संघासाठीच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही. मी नॅशनल टीममध्ये नसलो तरी मात्र माझ्या जागी ज्या तरुण मुलांना त्यांची क्षमता सिद्ध करुन दाखवण्यासाठी संधी मिळाली असून त्यांच्यासाठी मला फार आनंद होत आहे. मला यासंदर्भात कोणतीही तक्रार नाही," असं मार्कस स्टॉयनिस म्हणाला.
Marcus Stoinis said, "I know I'm not in the Australian national contract list, but I'm really happy that younger kids who want to prove themselves have got. I'm absolutely fine with it".
- Stoinis, a gem of a person! pic.twitter.com/BocjSr1VvO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 23, 2024
मार्कस स्टॉयनिसने राष्ट्रीय संघात तरुणांना संधी मिळत असल्याबद्दल व्यक्त केलेलं समाधान पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकीकडे अनेकदा क्रिकेटपटू अगदी निवृत्तीपर्यंत वाट पाहत संघात जागा अडवून राहतात आणि दुसरीकडे मार्कस स्टॉयनिससारखे खेळाडू तरुणांना संधी मिळते म्हणून समाधानी असल्याचं पाहून आनंद वाटल्याचं म्हटलं आहे.