IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) वारसदार होण्यासाठी अगदी योग्य असल्याचं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मांडलं आहे. त्याच्यामध्ये कर्णधार होण्यासाठी असणारे सर्व गुण असल्याचं कौतुक विरेंद्र सेहवागने केलं आहे. सेहवागला शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील एकाची निवड करण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी त्याने शुभमनच्या पाठीशी हवा तितका पाठिंबा नसल्याचं मत मांडलं. कोलकाताविरोधातील सामना जिंकत चेन्नईने या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने चांगली खेळी केली. यानंतर सेहवागने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली.
विरेंद्र सेहवागने Cricbuzz शी संवाद साधताना 2021 मध्ये वर्तवण्यात आलेल्या भाकितांचा उल्लेख केला. कर्णधाराबद्दलचं मत एकतर त्याने दिलेले निकाल किंवा नेतृत्व कौशल्याच्या आधारे तयार केलं जाऊ शकतं. आपल्या या विधानाला जोड देताना विरेंद्र सेहवागने 2007 मध्ये कोणालाही महेंद्रसिंग धोनी संघाला टी-20 वर्ल्डकप जिंकून देईल असं वाटलं नव्हतं सांगितलं. पण या विजयानंतर बीसीसीआयने धोनीला एकदिवसीय संघ आणि नंतर कसोटी संघाचा कर्णधार केलं.
ऋतुराज गायकवाडने अद्याप निकाल दाखवले नसले तरी त्याच्यात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार होण्याचे गुण आहेत असं सेहवागने म्हटलं आहे. "मी फार आधीच हा अंदाज लावला होता की, तो चेन्नई संघाचा कर्णधार होईल. त्याने आपलं कौशल्य आणि तशी लक्षणं दाखवली होती. तुम्ही कर्णधाराचा निर्णय एकतर निकाल किंवा त्याच्या नेतृत्व कौशल्याच्या आधारे करु शकता. त्याच्यात हे दोन्ही आहेत", असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.
पुढे त्याने म्हटलं की, "धोनी टी-20 वर्ल्डकप जिंकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण तो जिंकल्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्य.. यानंतर त्यांनी एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही त्याच्याकडे सोपवण्याचं ठरवलं. ऋतुराज गायकवाडसोबतही तेच आहे. वेळेसह निकालही दिसेल. पण आपण शांत आणि संयमी असल्याचे गुण त्याने दाखवले आहेत. तो आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर करतो. सध्या चेन्नईचं नेतृत्व करण्यासाठी तो उत्तम खेळाडू आहे".
ऋतुराज गायकवाडने सोमवारी एम ए चिदंबरम स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात 138 धावांचा पाठलाग करताना चांगली खेळी केली होती. त्याने 58 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. चेन्नई सुपरकिंग्ज गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना 14 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात होणार आहे. वानखेडे मैदानात हा सामना पार पडेल.