बंगळुरू : आयपीएलची टीम बंगळुरूनं त्यांचा प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी, बॅटिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक ट्रेंट वूडहिल आणि अॅन्ड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा समावेश आहे. पण आशिष नेहरा बंगळुरूच्या टीमचा बॉलिंग सल्लागार म्हणून कायम राहिल, अशी बातमी मुंबई मिररनं दिली आहे. व्हिटोरीऐवजी बंगळुरूच्या टीमचे नवे प्रशिक्षक म्हणून भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या नावाची चर्चा आहे.
बंगळुरूची फ्रॅन्चायजीनं कर्णधार विराट कोहलीच्या शिफारसींवरून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची गच्छंती केल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. तसंच पुढच्या आठवड्यात नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची घोषणा होईल, असं बोललं जातंय.
आयपीएलच्या इतिहासामध्ये बंगळुरूची टीम ही नेहमीच तगडी म्हणून ओळखली जाते. पण मागच्या ११ मोसमांमध्ये एकदाही बंगळुरूला आयपीएल जिंकता आलं नाही. विराटच्या टीमनं २०१८ साली १४ पैकी फक्त ६ मॅच जिंकल्या होत्या. विराट आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू असूनही बंगळुरूची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर होती.
याआधी २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्यांच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यामुळे आपण राजीनामा द्यायचा निर्णय घेतल्याचं कुंबळे म्हणाले होते.