मुंबई : जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं आहे. अमेरिकेमध्ये सध्या 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' ही मोहीम जोरात सुरू आहे. या मुद्द्यावरूनच वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने गंभीर आरोप केले. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना मला काळू म्हणलं जायचं, असं सॅमी म्हणाला. टीममधले काही जणच मला या वर्णद्वेषी नावाने हाक मारायचे, असं सॅमी त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हणाला.
डॅरेन सॅमीने कोणाचीही नावं घेतली नसली, तरी आता काही जुन्या सोशल मीडिया पोस्ट समोर आल्या आहेत. ईशांत शर्माने इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या एक फोटोमध्ये सॅमीचा उल्लेख काळू असा केला आहे. तर दुसरीकडे सॅमीने लक्ष्मणला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वत:लाच काळू म्हणून संबोधलं आहे. त्यामुळे लक्ष्मण सॅमीला काळू म्हणायचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Happy birthday @VVSLaxman281 May God continue to bless you. #bestdresser oh remember dark kalu.
— Daren Sammy (@darensammy88) November 1, 2014
काळू या शब्दाचा अर्थ मला आत्ता कळाला, त्यावेळी काळू म्हणजे काहीतरी चांगला शब्द असेल, असं मला वाटलं होतं. या सगळ्याबद्दल आता मला राग येतोय, अशी पोस्ट सॅमीने इन्स्टाग्रामवर टाकली.
'ज्यांनी मला त्या नावाने संबोधलं, त्यांना मी मेसेज करणार आहे. मला त्या नावाने कोण हाक मारायचं हे त्यांना माहिती आहे. मला त्या नावाने हाक मारल्यावर टीममधले सगळे जण हसायचे, त्यामुळे हे काहीतरी मजेशीर असेल, असं मला वाटायचं,' असं सॅमी म्हणाला आहे.
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून खेळताना मला आणि थिसारा परेराला काळू म्हणलं जायचं, असा दावा सॅमीने केला आहे. डॅरेन सॅमी २०१३ आणि २०१४ सालच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून २६ मॅच खेळल्या.