यूएई : कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याची शानदार सुरुवात झाली. कोलकाताने दुसऱ्या टप्प्यातील 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला. कोलकाता ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकातासाठी सर्व काही योग्य सुरु होतं. मात्र कोलकातासाठी एक वाईट बातमी आली. (kkr spinner Kuldeep Yadav has been ruled out of IPL 2021 due to a knee injury)
कोलकाताच्या मॅच विनर खेळाडूला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे खेळाडूला स्पर्धेबाहेर पडावं लागलं आहे. मात्र याबाबतीत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) दुखापतीमुळे या मोसमातून बाहेर पडावं लागलं आहे. कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे कुलदीप बाहेर पडला आहे. त्यामुळे कोलकातासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
कुलदीप आता यूएईवरुन भारतात परतला आहे. कुलदीपला आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांनाही मुकावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरावादरम्यान दुखापत
"आम्हाला माहिती मिळाली आहे की, यूएईत सरावादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. कदाचित फिल्डिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव सागंण्याच्या अटीवर पीटीआयला दिली.
प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी नाहीच
कुलदीपवर सातत्याने अन्याय सुरुच आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे कुलदीपने या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. या 14 व्या हंगामात कोलकाताने टीम मॅनेजमेंटने कुलदीपला एकाही सामन्यात संधी दिली नाही.
कुलदीपला 13 व्या मोसमातही केवळ 5 सामन्यातच खेळवलं होतं. दरम्यान कुलदीप या दुखापतीतून लवकरात लवकर सावरावा, अशीच प्रार्थना त्याच्या चाहत्यांकडून केली जात आहे.