kl rahul flop ind vs aus 1st test: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या सीरीजमधील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने शनिवारी तिसऱ्या दिवशीच सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघातील एका खेळाडूला संघातून बाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. बरं ही मागणी कोणत्याही खेळाडूने किंवा चाहत्यांनी केलेली नाही तर भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली आहे.
अनुभवी ओपनर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय टीमने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरीजच्या सुरुवातीचा सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला तिसऱ्याच दिवशी पराभूत केलं. भारतीय गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात 177 वर बाद केलं. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची खेळी केली तर रवींद्र जडेजाने 70 धावांची खेळी केली. याचबरोबर अक्षर पटेलनेही 84 धावांची दमदार खेळी केल्याने भारताला 400 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांवर आटोपला. ऑलराउंडर रवींद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण 70 धावा केल्या धावा केल्या आणि सात विकेट्स घेतल्या.
सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असला तरी भारतीय संघाचा गोलंदाजीचा माजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रासादने ट्विटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. प्रसादने भारतीय संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार के. एल. राहुलला संघातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
"राहुलच्या क्षमतेचा आणि प्रतिभेचा मला पूर्ण आदर वाटतो. मात्र दुख:द गोष्ट ही आहे की त्याची कामगिरी फारच खालावली आहे. 46 टेस्ट सामन्यानंतर 34 ची सरासरी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वर्षांहून अधिक कालावधीनंतर अशी सरासरी फारच सामान्य बाब आहे. असे आपल्याला फारच कमी खेळाडू सापडतील ज्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे," असं प्रसाद म्हणाला.
I have a lot of regard for KL Rahul’s talent and ability, but sadly his performances have been well below par. A test average of 34 after 46 tests and more than 8 years in international cricket is ordinary. Can’t think of many who have been given so many chances. Especially..cont
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 11, 2023
प्रसाद एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने राहुलला संघामध्ये स्थान देण्यावरुन भेदभाव केला जात असल्याचाही आरोप केला आहे. अन्य एका ट्वीटमध्ये प्रसादने, "शुभमन गिल उत्तम कामगिरी करतोय. सरफराज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतकं झळकावतोय. असे अनेकजण के. एल. राहुलच्या जागी संधी मिळण्यासाठी पात्र आहेत. मात्र काही भाग्यवान असतात की त्यांना यशस्वी होईपर्यंत न मोजता येईतील इतक्या संधी दिल्या जातात. तर काहींना अशा संधी मिळत नाही. राहुलची निवड कामगिरीच्या आदारावर नाही तर भेदभावाच्या आधारावर झाली आहे," असं म्हटलं आहे.
Rahul’s selection is not based on performance but favouritism . Has been Consistently inconsistent and for someone who has been around for 8 years not converted potential into performances.
One of the reasons why many ex-cricketers aren’t vocal despite seeing such favouritism..— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 11, 2023
के. एल. राहुल नागपूर टेस्टच्या पहिल्या डावामध्ये रोहित शर्माबरोबर सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. त्याला केवळ 20 धावा करता आल्या. यासाठी त्याने 71 चेंडूंचा सामना केला. त्याने एक षटकार लगावला. दुसरीकडे रोहितने शतक झळखावलं. इतकच नाही तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलनेही अर्धशतकं झळकावली. राहुलने आतापर्यंत 46 टेस्टमध्ये 34 च्या सरासरीने 2624 धावा केल्या. त्याने 7 शतकं आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत.