लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. पहिल्या टेस्टमध्ये फक्त ३१ रननी भारताला पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहलीनं १४९ आणि ५१ रनची खेळी केली. कोहली वगळता पहिल्या टेस्टमध्ये सगळे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले. तर दुसऱ्या टेस्टमध्ये सगळ्याच भारतीय बॅट्समननी इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगसमोर लोटांगण घातलं. अश्विन हा भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये २९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद ३३ रन केल्या.
या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्रीवर टीकेची झोड उठतेय. बीसीसीआयनंही या दोघांना सूचक इशारा दिला आहे. सीरिज गमावली तर कोहली आणि शास्त्रीला बीसीसीआयच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. कोहली आणि शास्त्रीला एवढं स्वातंत्र्य का देण्यात येतंय, असा सवालही बीसीसीआयमधून उमटू लागला आहे. तसंच भारतानं सीरिज गमावली तर या दोघांना देण्यात आलेले अधिकारही कमी करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिसऱ्या टेस्ट मॅचनंतर चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचची टीम घोषित होणार आहे. शनिवारपासून नॉटिंगहॅममध्ये तिसऱ्या टेस्टला सुरुवात होईल. या मॅचनंतरच्या कामगिरीवरच कोहली-शास्त्रीवरच्या कारवाईचा विचार केला जाईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ही प्रतिक्रिया दिली आहे.
टेस्ट सीरिजच्या सरावासाठी वेळ मिळाला नाही अशी तक्रार आता भारतीय टीम करु शकत नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये सरावासाठी आणि सराव सामन्यासाठी वेळ मिळाला नाही अशी तक्रार भारतीय टीमनं केली होती. त्यामुळे आम्ही इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजआधी टी-२० आणि वनडे सीरिज खेळवण्याचा निर्णय घेतला, असं हा अधिकारी म्हणाला.
भारतीय टीमनं सांगितल्यामुळेच आम्ही भारतीय ए टीमला इंग्लंड दौऱ्यावर पाठवलं. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय भारतीय ए टीम सोबत गेले. तुम्ही केलेल्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या त्यामुळे कोहली-शास्त्रीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
सध्याच्या भारतीय टीम आणि टीम व्यवस्थापनाचा ऑस्ट्रेलियामध्ये २०१४-१५ साली २-०नं, दक्षिण आफ्रिकेमध्ये २०१७-१८ साली २-१नं पराभव झाला आणि आता इंग्लंडमध्येही भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या प्रदर्शनाचीही समिक्षा होईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.