मुंबई : तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली. याअंतगर्त अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे आरोप केले. यानंतर आता याचं लोण क्रिकेटमध्येही पसरू लागलं आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगावरही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. भारतीय गायिका चिन्मयी श्रीपदानं महिलांसोबत झालेल्या अत्याचारांच्या मुद्द्यावरून लसिथ मलिंगावर आरोप केले आहेत. एका पीडित महिलेचा आवाज उठवत श्रीपदानं मलिंगावर आरोप केले आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान मलिंगानं हॉटेलच्या रुममध्ये एका मुलीवर जबरदस्ती केल्याचा दावा श्रीपदानं केला आहे.
एका महिलेसोबत झालेल्या या प्रकाराबाबत श्रीपदानं ट्विटरवर माहिती दिली आहे. या पीडितेनंच तिच्याबरोबर झालेल्या या घटनेबद्दल मला सांगितल्याचं श्रीपदा ट्विटमध्ये म्हणाली आहे. काही वर्षांपूर्वी आयपीएलदरम्यान ती मुलगी मुंबईत होती. त्यावेळी ती हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणीला शोधत होती. अचानक मलिंगासोबत तिची भेट झाली. तुझी मैत्रिण माझ्या खोलीत असल्याचं मलिंगानं त्या मुलीला सांगितलं. मुलगी मलिंगाच्या खोलीत गेली पण त्याच्या खोलीत कोणीच नव्हतं.
खोलीमध्ये मलिंगानं त्या मुलीला बिछान्यावर ढकललं आणि तो तिच्या अंगावर गेला. मुलीनं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये तिला अपयश आलं. मुलीनं तिचं तोंड आणि डोळे बंद केले. मलिंगानं मुलीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यानं दरवाजा ठोठावला. मलिंगा दरवाजा उघडायला गेला तेव्हा ती वॉशरूममध्ये पळाली. वॉशरूममध्ये त्या मुलीनं चेहरा स्वच्छ केला आणि खोलीतून पळ काढला, असं ट्विट श्रीपदानं केलं आहे.
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाव समोर आलेला मलिंगा दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. कालच एका भारतीय एअर हॉस्टेसनं श्रीलंकेचाच माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. लसिथ मलिंगानं ३० टेस्ट मॅचमध्ये १०१ विकेट तर २०७ वनडेमध्ये ३०६ विकेट घेतल्या आहेत.
Cricketer Lasith Malinga. pic.twitter.com/Y1lhbF5VSK
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 11, 2018