नवी दिल्ली : सगळ्यांचा मदतीला धाऊन जाणारा, अशी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची ओळख आहे. भारतीय टीममध्ये निवड झालेल्या नवदीप सैनीचीही गंभीरनं मदत केली आहे. यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे मोहम्मद शमीऐवजी सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे. डिसेंबर २०१३ मध्ये रोशनआरा क्रिकेट मैदानात दिल्लीच्या रणजी टीमकडून सैनीनं पहिल्यांदाच सीझनच्या लाल बॉलनं सराव केला. याआधी सैनी २५०-५०० रुपयांच्या पॉकेटमनीसाठी नवदीप सैनी टेनीस बॉल क्रिकेट खेळायचा. लाल एसजी बॉलनं खेळण्याचा सैनीला कोणताही अनुभव नव्हता. पण गौतम गंभीरनं त्याची मदत केली. टेनिस बॉलनं जशी बॉलिंग करतोस तशीच या बॉलनंही बॉलिंग कर, असं मला गौतम गंभीरनं सांगतिल्याचं नवदीप सैनी म्हणाला.
गौतम गंभीरनं मला जे सांगितलं तेच मी केलं. त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. गंभीरबद्दल बोलताना मी भावूक होतो. डीडीसीएच्या अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतरही गंभीरनं मला पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया नवदीप सैनीनं दिली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली डिसट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन(डीडीसीए)चे सदस्य बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहान यांनी सैनीच्या निवडीला विरोध केला होता. पाच वर्षांपूर्वी बिशनसिंग बेदींनी तत्कालिन डीडीसीए अध्यक्ष अरुण जेटलींना पत्र लिहून नवदीप सैनीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी नवदीप सैनीला दिल्लीच्या रणजी टीममध्ये विदर्भाविरुद्धच्या मॅचसाठी निवडण्यात आलं होतं. नवदीप सैनी मागच्या वर्षी दिल्लीमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. रणजी टीममध्ये सैनीची निवड झाली तर ती बाहेरच्या खेळाडूची निवड असेल. अनेक प्रतिभावान खेळाडू त्यांच्या संधींची वाट पाहत आहेत. तुम्ही सैनीला संधी दिलीत तर तो अन्याय असेल, असं पत्र पाच वर्षांपूर्वी बेदींनी अरुण जेटलींना पाठवलं होतं.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. टेस्ट सीरिजआधी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय बोर्डाच्या टीमची मॅच झाली. या मॅचमध्ये सैनीनं डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही ओपनरची विकेट सैनीनं घेतली होती. यापैकी एक डेव्हिड वॉर्नर होता. वॉर्नरला बाऊन्सर टाकून सैनीनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.