IND vs PAK: संपूर्ण क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा लागलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपला (ODI World Cup) 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात हा वर्ल्डकप होणार आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेटमधील हा रणसंग्राम 5 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zeland) यांच्यातील सामन्याने वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारा भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, 19 नोव्हेंबरला वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असले की संपूर्ण क्रिकेटविश्वाचं याकडे लक्ष असतं. दोन्ही देशातील क्रिकेट चाहते यावेळी प्रचंड आक्रमक झालेले असता. मैदानातील खेळाडूंमध्येही अनेकदा हा आक्रमकपणा दिसतो आणि त्यातून वाद होतात. त्यातही वर्ल्डकपमध्ये हे संघ आमने-सामने आल्यानंतर हा उत्साह आणि आक्रमकपणा अधिक वाढलेला असतो.
यावेळीही वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहेत. 15 ऑक्टोबरला दोन्ही संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. तसंच वर्ल्डकपचा पहिला आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होऊ शकतात. तसंच भारताचा पहिला सामना पाचवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाविरोधात होणार आहे.
पाकिस्तान संघ भारतात येण्यासाठी तयार झाला असल्याचं वृत्त Cricbuzz ने दिलं आहे. पण काही माध्यमांनुसार, पाकिस्तान संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळण्यास इच्छुक नाही. सध्याच्या माहितीनुसार, पाकिस्तान संघ अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरु येथे सामने खेळणार आहे.
वर्ल्डकपमध्ये एकूण 10 संघ भिडणार आहेत. या 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पात्र ठरले आहेत. इतर दोन संघ कोणते असतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जून-जुलै महिन्यात झिम्बाम्बेमध्ये पात्रता स्पर्धा होणार आहे, यानंतर दोन संघांची निवड होईल. पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब आणि झिम्माम्बे संघ सहभागी असणार आहेत.
2019 च्या वर्ल्डकपप्रमाणे यावेळी राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळले जाणार आहे. म्हणजेच प्रत्येत फक्त एक वेळा एकमेकांविरोधात खेळतील. ग्रुप स्टेजनंतर सर्व संघ 9-9 सामने खेळलेले असतील. ग्रुप स्टेजमधील टॉप चार संघ उपांत्यफेरीत भिडतील.