PAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार?

Pakistan vs Bangladesh : एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Feb 3, 2024, 11:01 PM IST
PAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार? title=
U19 World Cup 2024 final

U19 World Cup 2024 : अंडर-19 वर्ल्ड कपचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर-6 मधील एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा (Pakistan vs Bangladesh) पराभव करून सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलंय. पाकिस्तानच्या या विजयासह आता सेमीफायनलचे चारही संघ निश्चित झाले आहेत. एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन कट्टर विरोधक संघात फायनलचा सामना होणार की काय? असा सवाल विचारला जातोय.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रोहनत डौल्ला बोरसन आणि ऑफस्पिनर शेख पेवेझ जिबोन यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्याने पाकिस्तानचा डाव 40.4 षटकांत 156 धावांत गुंडाळला गेला होता. त्यामुळे बांगलादेश सेमीफायनलमध्ये जाणार असं निश्चित मानलं जात होतं. मात्र, त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी 38.1 षटकात 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून त्यांचा नेट रन रेट (NRR) अधिक चांगला करायचा होता.

पाकिस्ताने देखील भेदक गोलंदाजी करत बांगलादेशला लवकर आटोपण्याचा प्रयत्न केला. सामना रोमांचक स्थितीत आला होता. समीकरणानुसार बांगलादेशला अखेरच्या 15 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. मात्र, बांगलादेशच्या शेपटाच्या फलंदाजांना 6 धावा करता आल्या नाहीत अन् पाकिस्तानने थाटात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवलीये. पाकिस्तानसाठी उबेद शाहने 44 धावांत 5 बळी घेतले. तर अली रझाला 3 गडी बाद करण्यात यश मिळालंय.

दरम्यान, सुपर 6 च्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला. यासह उपांत्य फेरीचं वेळापत्रकही निश्चित झालंय. 6 आणि 8 फेब्रुवारीला दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्ड कप उचलणार का? असा सवाल विचारला जात आहे.

पाकिस्तान : शमिल हुसेन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (C), अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली असफंद, अली रझा.

बांगलादेश : आशिकुर रहमान शिबली, जिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, शेख पावेझ जिबोन, महफुजुर रहमान रब्बी (C), रोहनत दौल्ला बोरसन, मोहम्मद इक्बाल हुसेन एमोन , मारुफ मृधा.