Riteish Deshmukh On Rohit Sharma Run Out: टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा टेस्ट सामना 6 विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 100 वी टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने फोर मारून टीमला विजय मिळवून दिला. मात्र यावेळी टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु असताना चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. दरम्यान कर्णधाराच्या या कृत्याचं कौतुक होताना दिसतंय. अशातच मराठमोळा आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील रिएक्शन दिलं आहे.
दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा रन आऊट झाला. मात्र यावेळी रोहित चेतेश्वर पुजाराला देखील रन आऊट करू शकत होता. मात्र स्वार्थीपणा बाजूला ठेऊन आणि पुजाराची 100 टेस्ट आहे हे लक्षात घेऊन त्याने स्वतःची विकेट गमावली. यावरून अभिनेता रितेश देशमुखने देखील रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.
रितेशने याबाबत ट्विट केलंय. रितेश त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, रोहित शर्माने पुजारासाठी स्वतःच्या विकेटचा त्याग केला...याला म्हणतात कर्णधाराची लीडरशीप! केवळ रितेश देखमुख नाही तर सोशल मीडियावर रोहितच्या या कृत्याचं खूपचं कौतुक होताना दिसतंय.
What @ImRo45 did for @cheteshwar1 that’s leadership. #captain
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2023
डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये 2 रन्स घेण्याच्या नादात रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये रन घेण्याच्या कॉलवरून दोघांमध्ये गफलत झाली आणि रोहित रन आऊट झाला. झालं असं की, रोहित शर्मा फिल्डरला पाहून त्याच्या क्रीजमध्ये परतला होता, मात्र तोपर्यंत पुजारा रोहितपर्यंत पोहोचला होता. यावेळी रोहित पुजाराला वाचवण्यासाठी स्वतः क्रीजबाहेर आला आणि विकेट गमावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर टीम इंडियाच्या वतीने शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.