New Zealand Defeats India: बंगळुरुमधील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने पुण्यातही तशीच कामगिरी करत आणखी एक कसोटी सामना गमावला आहे. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. न्यूझीलंडने भारतात येऊन कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे कसोटीत भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला. भारताला 113 धावांनी सामना गमवावा लागला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या पराभवानंतर फार नाराज दिसला. पराभवावर बोलताना रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. तसंच त्याने पराभव का झाला याची कारणंही सांगितली आहेत.
रोहित शर्माने आपल्या विधानाची सुरुवात निराशाजनक शब्दाने केली. हा पराभव फारच निराशाजनक असल्याचं रोहित शर्माने सांगितलं. तो म्हणाला की, "ज्याची आम्हाला अपेक्षा होती, तसं झालेलं नाही. न्यूझीलंडला याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी चांगली खेळी केली. आम्ही काही खास क्षणांचा फायदा घेण्यात असमर्थ ठरलो. आम्ही त्या आव्हानांना उत्तर देण्यात असमर्थ ठरलो, ज्यामुळे आज आम्ही येथे आहोत. आम्ही चांगली धावसंख्या उभारु शकू इतकी चांगली फलंदाजी केली नाही. तुम्हाला जिंकण्यासाठी 20 विकेट घ्याव्या लागतील. पण फलंदाजांनाही बोर्डावर धावा उभाराव्या लागतील".
रोहित शर्माने भारताच्या अपयशी फलंदाजीवर म्हटलं की, "त्यांना 250 धावांवर रोखणं हे एक जबरदस्त पुनरागमन होतं. पण हे फार आव्हानात्मक असेल याची आम्ही जाणीव होती. जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांची धावसंख्या 200 वर 3 विकेट होती. त्यांना 259 वर सर्वबाद करणं एक चांगला प्रयत्न होता. ही अशी खेळपट्टी नव्हती जिथे फार काही होत होतं. आम्ही फक्त चांगली फलंदाजी केली नाही".
रोहित शर्माने पराभवासाठी कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार धरलं नाही. "जर आम्ही पहिल्या डावात थोडे जवळ असतो तर गोष्टी वेगळ्या असत्या. आमची वानखेडेत चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे. तो कसोटी सामना जिंकण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु. हा पराभव सांघिक आहे. मी असा व्यक्ती नाही जो फक्त फलंदाज किंवा गोलंदाजांना दोष देईल. आम्ही वानखेडेत चांगली कामगिरी करु इच्छित आहोत. आम्ही त्याच इराद्याने मैदानात उतरु".