इंदौर : दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत क्लीन स्वीप देण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाहुण्या टीमने भारताचा पराभव केला. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारताने प्रथमच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. दरम्यान सलग दोन टी-20 सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने क्लीन स्वीपची संधी का गमावली? संघाच्या पराभवाची कारणे काय होती? हे जाणून घ्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या T20 मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर फलंदाजीसाठी विकेट चांगली होती. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित करणं भारताला महाग पडलं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी फलंदाजीसाठी योग्य विकेटवर 20 ओव्हर्स 227 रन्स केले. केएल राहुल आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. रोहित शर्मा बाद होताच भारताचा डाव गडगडला, शेवटी भारताचा सामना गमवावा लागला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आलं. उमेश यादवने टेंबा बावुमाला बाद करून भारताला पहिली यश मिळवून दिली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 30 धावा होती. या टीम इंडियाने आणखी एक-दोन विकेट घेतल्या असत्या तर दक्षिण आफ्रिकेला दडपणाखाली आणता आलं असतं. भारतीय गोलंदाजांनी योग्य गोलंदाजी केली नाही. दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावल्या. यापैकी केवळ भारतीय गोलंदाजांनी दोन विकेट घेतल्या. एक फलंदाज रनआऊट झाला.
आशिया कपमधील डेथ ओव्हरने सुरू झालेला त्रास टीम इंडियाचा पाठलाग सोडण्याचं नाव घेत नाहीये. अर्शदीप सिंगच्या दुखापतीमुळे इंदूर T20 मध्ये डेथ ओव्हरचा गोलंदाज म्हणून हर्षल पटेल हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय होता. पण त्याने 4 ओव्हरमध्ये 49 रन्स दिले. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटची ओव्हर दीपक चहरने टाकली आणि ती देखील महागडी ठरली. डेव्हिड मिलरने त्याच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकले. भारताने शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 73 रन्स दिल्या.