Sachin Tendulkar IPO Investment Plan : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) गुंतवणुकीच्या मैदानात देखील खोऱ्यानं पैसा ओढत असल्याचं दिसून येतंय. क्रिकेटच्या मैदानात सचिनला बाद करता आलं नाही... ना त्याचा हात कोणाला धरता आलाय, पण आता सचिन गुंतवणुकीच्या खेळात देखील मास्टर ब्लास्टर ठरल्याचं पहायला मिळतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडूलकरला फक्त 9 महिन्यात 531 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे आता सचिनच्या फॅन्ससह इतर गुंतवणूकदार (IPO Investment) देखील थक्क झाल्याचं पहायला मिळतंय.
हैदराबादच्या आझाद इंजिनीअरिंग या कंपनीत ९ महिन्यांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर सचिनला भरघोस परतावा मिळाला आहे. सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे. IPO च्या आधी स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूनंतर, सचिनकडे कंपनीचे 4,38,210 शेअर्स होते. त्याची सरासरी किंमत प्रतिशेअर फक्त 114.1 रुपये आहे. 740 कोटी रुपयांच्या IPO मध्ये तेंडुलकरने स्टेक ऑफलोड न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा त्याला झाल्याचं पहायला मिळालं आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेश स्टार्क हा आयपीएलच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, आता सचिनने स्टार्कला देखील मागे टाकून 26.5 कोटींचा परतावा मिळवला आहे. 6 मार्च रोजी, तेंडुलकरने कंपनीमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांची इक्विटी घेतली होती. ऊर्जा, एरोस्पेस आणि संरक्षण आणि तेल आणि वायू उद्योगांमध्ये याचा वाटा आहे.
दरम्यान, आझाद अभियांत्रिकी 1983 मध्ये सुरू झाली. कंपनी एरोस्पेस आणि टर्बाइन घटक तयार करते. आझाद अभियांत्रिकी आपली उत्पादने एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, तेल आणि वायू उद्योगांमधील मूळ उपकरण उत्पादकांना पुरवते. या आयपीओने पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही मोठा फायदा दिला आहे. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना तब्बल 215% परतावा मिळाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3.15 कोटी रुपये झालंय.