थायलंड : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं 4 मार्च रोजी निधन झालं. त्याच्या निधानाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला. वयाच्या 52 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे त्याने जगाचा निरोप घेतला आहे. दरम्यान अटॉप्सी रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूच्या कारणाचा खुलासा झाला आहे. अशातच आता मृत्यूपूर्वी शेवटच्या काही तासांमध्ये शेन वॉर्न काय करत होता याचा खुलासा झाला आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वीच्या काही काळ अगोदरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमधून शेन वॉर्नने मसाज करणाऱ्या महिलांना रिसॉर्टमध्ये बोलवलं असल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांवर महिला रिसॉर्टमध्ये एन्ट्री केल्याची माहिती आहे. यामध्ये 4 महिला असून 2 शेन वॉर्नच्या रूममध्ये गेल्या तर 2 त्याच्या मित्रांकडे गेल्या.
सीसीटीव्ही कॅमेराच्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी रिसॉर्टमधून बाहेर निघाल्या. यानंतर 2 तास 17 मिनिटांनी शेन वॉर्न त्याच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही असंही यात म्हटलं आहे.
निवेदनात मृत्यूचं कारण उघड करण्यात आलेले नाही. वॉर्नला हृदयविकाराचा झटका आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. थायलंडमधील कोह सामुई बेटावर वॉर्न त्याच्या हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.