Under 19 World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत करोडो भारतीयांचं स्वप्न मोडलं होतं. दरम्यान अंडर-19 भारतीय संघ या पराभवाचा वचप काढेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. पण अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली आणि भारतीयांच्या पदरी निराशा पडली. या पराभवानंतर कर्णधार उदय सहारनने आपले फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयशी पडले आणि काही चुकीचे फटके खेळल्या किंमत मोजावी लागली असं सांगितलं. भारतीय संघाने 79 धावांनी हा सामना गमावला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 43.5 ओव्हर्समध्ये फक्त 174 धावांवर सर्वबाद झाला. आदर्श सिंग (47) आणि मुरुगन अभिषेक (42) फक्त या दोनच फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी झुंज दिली. "आम्ही काही वाईट फटके खेळलो. खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकलो नाही. आम्ही तयारी केली होती, पण ती योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाही," असे सहारनने मॅचनंतरच्या सादरीकरणादरम्यान सांगितलं.
दरम्यान अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी कर्णधार उदय सहारन याने स्पर्धेत संघाने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. "ही फार चांगली स्पर्धा होती. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे. ते सर्वजण चांगले खेळले. त्यांना चांगली लढवय्या प्रवृत्ती दाखवली, ज्याचा मला अभिमान आहे," असं त्याने म्हटलं आहे.
"आम्हाला सुरुवातीपासून ते आतापर्यंत फार काही शिकायला मिळालं. कोचिंग स्टाफपासून ते सामन्यांपर्यंत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला असंच शिकत राहत, पुढे प्रवास करायचा आहे," असं उदय सहारन म्हणाला. "हे अविश्वसनीय आहे. मला आमचे खेळाडू, कोच यांचा फार अभिमान वाटत आहे. गेल्या काही महिन्यात आम्ही प्रचंड मेहन घेतली," असं कौतुक त्याने केलं.
"जर ऑस्ट्रेलियाने 250 पर्यंत धावसंख्या उभी केली, तर आम्ही नक्की जिंकू असा आत्मविश्वास होता. आमच्या संघाने संपूर्ण मालिकेत वर्चस्व राखलं. पण आज ते चुकीच्या बाजूने होते." अशी खंत त्याने व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताची सुरुवातच खराब झाली. आर्शिन कुलकर्णी 3 धावांवर बाद झाला. तर मुशीर खान देखील झटपट धावा करण्याच्या नादात विकेट गमावून बसला. त्याने फक्त 22 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन दास यांनी एकामागून एक विकेट्स फेकल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. 90 धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र, आर्दश कुलकर्णीने एकाकी झुंज दिली. आदर्श बाद झाल्यानंतर मात्र भारतीय संघाचा लढाही संपला आणि संघ पराभूत झाला. मुरुगन अभिषेक याने अखेरपर्यंत झुंज दिली. परंतू त्याला यश आलं नाही. तो 42 धावांची खेळी करून बाद झाला.