Rivaba Jadeja on Father in Law: भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्या त्याच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जाडेजा (Anirudhsinh Jadeja) यांनी मुलगा आणि सूनेवर अनेक आरोप केले असून, गेल्या अनेक काळापासून चांगले संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. रवींद्र जाडेजाच्या वडिलांनी दिलेली मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या आरोपांवर रवींद्र जाडेजानेही उत्तर दिलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात रवींद्र जाडेजाची पत्नी आणि भाजपा आमदार रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांना याबद्दल विचारण्यात आलं असता त्या संतापल्या. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू काय आहे याची आठवण त्यांनी पत्रकाराला करुन दिली.
कार्यक्रमानंतर रिवाबा जाडेजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एका पत्रकाराने सासऱ्यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं. त्यावर रिवाबा संतापल्या आणि म्हणाल्या की, "आज आपण येथे कशासाठी आलो आहोत? जर तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला थेट संपर्क करा".
याआधी रवींद्र जाडेजाने सोशल मीडियावरुन आपल्या वडिलांच्या आरोपांवर व्यक्त होताना ही मुलाखत अर्थहीन आणि खोटी असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. "दिव्य भास्करला दिलेल्या मुलाखतीत मांडण्यात आलेल्या गोष्टी अर्थहीन आणि खोट्या आहेत. या एकतर्फी कमेंट असून, मी त्यांच्याशी सहमत नाही. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हा चुकीचा आणि निषेधार्ह आहे. मलाही फार काही बोलायचं आहे, पण मी जाहीरपणे त्यांचा खुलासा न करणंच चांगलं आहे," असं रवींद्र जाडेजा म्हणाला आहे.
रवींद्र जाडेजाच्या वडिलांनी मुलाखतीत आपला मुलगा आणि सून वेगळे राहत असून आपल्याशी फार कमी संपर्क साधतात असा खुलासा केला होता. "मी तुम्हाला सत्य सांगू का? माझे रवींद्र जाडेजा आणि सून रिवाबा यांच्याशी काही संबंध नाही. आम्ही त्यांना फोन करत नाही, आणि तेदेखील संपर्क साधत नाहीत. लग्नाच्या दोन ते तीन महिन्यानंतरच या समस्या सुरु झाल्या होत्या," अशी माहिती त्यांनी दिली.
रवींद्र जाडेजाच्या वडिलांनी यावेळी आपण मुलाला क्रिकेटर बनवल्याचा पश्चातापही बोलून दाखवला. जर आपण त्याला क्रिकेटर बनवलं नसतं, तर कदाचित गोष्टी वेगळ्या असत्या असं ते म्हणाले. "मी सध्या जामनगरमध्ये एकटाच राहत आहे. रवींद्र आपल्या मालकीच्या वेगळ्या बंगल्यात राहतो. एकाच शहरात राहत असतानाही आमची भेट होत नाही. त्याच्या पत्नीने त्याच्यावर काय जादू केली आहे हेच समजत नाही," असा आरोप त्यांनी केला.
"तो माझा मुलगा आहे आणि या गोष्टींमुळे मला फार मानसिक त्रास होतो. मी त्याचं लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं असं कधीतरी वाटतं. जर तो क्रिकेटर झाला नसता तर चांगलं झालं असतं. या सर्वातून आम्हाला जावं लागलं नसतं," असंही ते म्हणाले.
"लग्नानंतर तीन महिन्यातच तिने सगळं काही माझ्या नावे ट्रान्सफर झालं पाहिजे असं सांगितलं. तिने कुटुंबात वाद निर्माण केले. तिला कुटुंब नको असून, स्वतंत्र आयुष्य हवं आहे. मी किंवा रवींद्रची बहीण चुकीचे असू शकतो, पण कुटुंबातील 50 सदस्य कसे काय चुकीचे ठरु शकतात? कुटुंबातील कोणाशीही त्याचं नातं नाही. फक्त द्वेष आहे," असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले होते की, "मला काही लपवायचं नाही. मी 5 वर्षात आमच्या नातीचा चेहराही पाहिलेला नाही. रवींद्रचे सासू-सासरेच सगळं मॅनेज करतात. ते प्रत्येत गोष्टीत दखल देतात. त्यांना आता पैशांची खाण मिळालेली आहे".