Maharashtra Weather Today: फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढला आहे. होळी येण्याआधीच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. आज रविवारीदेखील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसासाठी पोषक हवामान असणार आहे. त्यामुळं एकीकडे पाऊस तर एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवणार आहे.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं कमाल तापमानात वाढ होत असून कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाने काहिली होण्याची शक्यता आहे. शनिवारी कोकणातील काही भागात तापमानाचा पारा 37 अंशापेक्षा अधिक असल्याची नोंद झाली होती. तर, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, गडचिरोली येथे पारा 36 अंशाच्या पार होता.
आज रविवारी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आठवडाभर रात्री आणि पहाटे गारवा अनुभवल्यानंतर मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटू लागला आहे. दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानावाढीचे हे सत्र पुढील दोन – तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिवाळ्याचा हंगामही संपुष्टात येण्याच्या बेतात आहे. दरम्यान, सध्या दुपारी पूर्वेकडून वारे वाहत आहेत, तर सायंकाळी उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.