'...तर रोहित 60 बॉलमध्येच शतक झळकावेल'; Ind Vs Pak मॅच आधी युवराजचं भाकित

Champions Trophy India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज दुबईच्या मैदानामध्ये एकदिवसीय सामना रंगणार असून त्यापूर्वीच युवराजने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2025, 06:44 AM IST
'...तर रोहित 60 बॉलमध्येच शतक झळकावेल'; Ind Vs Pak मॅच आधी युवराजचं भाकित
सामन्याआधीच भाकित

Champions Trophy India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वाधिक प्रतिक्षा असलेला सामना आज भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या मैदानात एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही संघ एकदिवसीय वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने भारतीय कर्णधार रोहित शर्माची पाठराखण केली आहे. रोहित शर्मा मागील काही काळापासून सातत्यपूर्ण खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. असं असलं तरी युवराजने रोहितवर विश्वास दाखवला आहे. 

सर्वात मोठा मॅच विनर

"रोहित शर्मा हा फॉर्ममध्ये असो किंवा नसो मला त्याचा फरसा फरक पडत नाही," असं युवराज सिंगने रोहितची पाठराखण करताना 'जिओ हॉटस्टार'वर म्हटलं आहे. "एकदिवसीय क्रिकेटमध्ये खास करुन व्हाइट बॉल फॉरमॅटमध्ये तो भारतासाठी सर्वात मोठा मॅच विनर ठरला आहे, हे आपण विसरता कामा नये," अशी आठवण युवराजने करुन दिली आहे.

...तर रोहित 60 बॉलमध्ये शतक झळकावेल

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे मॅच विनर आहेत, असं युवराजने म्हटलं आहे. "रोहित शर्मा सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय तरी त्याला धावा करता येत असतील तर हा विरोधी संघासाठी धोक्याचा इशारा आहे. तो फॉर्ममध्ये असेल तर तो 60 बॉलमध्ये शतक झळकावू शकतो," असं सूचक विधान युवराजने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बोलताना केलं आहे. 

पाकिस्तान उजवा ठरेल

रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांचे अखूड टप्प्याचे चेंडूही उत्तम पद्धतीने खेळतो, असं युवराज म्हणाला. मात्र भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान नैसर्गिक दृष्ट्‍या उजवा ठरेल असं मत युवराजने व्यक्त केलं आहे. दुबईमध्ये खेळण्याची पाकिस्तानी संघाला सवय असल्यानेच त्यांच्यासाठी हा नियमित सामना असेल, असं युवराजने म्हटलं आहे. 

रोहितची पाकिस्तानविरुद्ध कामगिरी कशी?

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानाविरुद्ध 873 धावा केल्या आहेत. त्याने 51.35 च्या सरासराने 92.38 च्या स्ट्राइक रेटने पाकिस्तानाविरुद्ध फलंदाजी करताना दोन शतकं आणि आठ अर्धशतकांसहीत इतक्या धावा केल्यात. सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 36 बॉलमध्ये 41 धावा केल्या आहेत.

भारताचा विजय पाकिस्तानचा पराभव

सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानसाठी हा आपआपला दुसरा सामना असणार आहे. स्पर्धेतील पाहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने यजमान पाकिस्तानला कराचीच्या मैदानावर 60 धावांनी धूळ चारली. तर दुबईमध्ये भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे.