मिताली राज टी-२० टीमबाहेर...सौरव गांगुली म्हणतो...

महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला भारतीय टीममध्ये घेण्यात आलं नाही.

Updated: Nov 25, 2018, 10:24 PM IST
मिताली राज टी-२० टीमबाहेर...सौरव गांगुली म्हणतो... title=

कोलकाता : महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला भारतीय टीममध्ये घेण्यात आलं नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हा निर्णय वादात सापडला आहे. माजी कर्णधार मिताली राजनं लागोपाठ २ अर्धशतकं केल्यानंतरही तिला इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये संधी देण्यात आली नाही. मिताली राजची मॅनेजर अनीशा गुप्ताने एका ट्वीटमधून हरमनप्रीतचा समाचार घेत तिला अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख म्हटलं. या सगळ्या वादावर आता भारतीय टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

टीमचं कर्णधारपद भुषवल्यानंतर मलाही बाहेर बसावं लागलं होतं. या ग्रुपमध्ये तुझं स्वागत आहे, असं मी मितालीला म्हणल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. कर्णधाराला जेव्हा बाहेर बसायला सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही तसंच करा. मी पाकिस्तान दौऱ्यावेळी फैसलाबादमध्ये असंच केलं होतं, ही आठवण गांगुलीनं करून दिली.

'मितालीसाठी हा अंत नाही'

मी जेव्हा वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये होतो तेव्हा १५ महिने मी एकही वनडे मॅच खेळलो नाही. आयुष्यात असं होतं. मितालीसाठी हा जगाचा अंत नाही, असं गांगुली म्हणाला. तुम्ही सगळ्यात चांगले आहात कारण तुम्ही काहीतरी केलं आहे आणि पुन्हा एक संधी आहे. त्यामुळे मी मितालीला बाहेर ठेवण्यामुळे निराश नाही. पण सेमी फायनलमध्ये भारताच्या पराभवामुळे नक्कीच निराश आहे, असं वक्तव्य गांगुलीनं केलं.