Jasprit Bumrah to return in T20 series: टीम इंडियाचा स्टार बॉलर यॉर्कर किंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गेल्या काही महिन्यापासून संघाबाहेर आहे. सप्टेंबर 2022 पासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे (Jasprit Bumrah Injury) क्रिकेटापसून लांब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराह शेवटचा खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला टीम बाहेर जावं लागलं. दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षी एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळता आला नाही. त्यामुळे आता बुमराह कधी कमबॅक करणार याची सर्वांना प्रतिक्षा होती. अशातच आता टीम इंडियाला खुशखबर मिळाली आहे.
यंदाच्या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू फिटनेसवर काम करत असल्याचं दिसतंय. अशातच आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो पुनरागमन करताना दिसू शकतो. बुमराह आता पूर्णपणे फीट झाला असून आगामी सामन्यात तो पुनरागमन करू शकतो, अशी माहिती माध्यमात आलेल्या रिपोर्टनुसार मिळाली आहे.
मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये ट्रेनिंग झाली. आयर्लंड मालिकेसाठी बुमराहच्या पुनरागमनाचे संकेत खूपच सकारात्मक आहेत. बुमराह दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर सामने खेळताना दिसणार आहे, अशी माहिती रिहॅबिलिटेशन बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, बुमराह दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता तो टीममध्ये कधी कमबॅक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदाचं वर्ष हे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं (ODI World Cup 2023) वर्ष असल्याने बुमराह टीम इंडियामध्ये असणं गरजेचं आहे. बुमराह आणि श्रेयस हे दोन्ही खेळाडू आता रिकव्हरीसाठी एनसीएमध्ये आहेत. दोन्ही खेळाडू फिजिओथेरपी घेत असल्याने आता लवकर खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.