मुंबई : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी अखेर तो क्षण काल आलाच. मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवत 2 पॉईंट्स कमावलेत. मुंबईच्या पहिल्या विजयानंतर चाहते फार आनंदी आहेत. वाढदिवसाच्याच दिवशी विजयाचं गिफ्ट मिळाल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. दरम्यान मुंबईच्या पहिल्या विजयानंतर मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सूर्यकुमार यादवने आपल्या शानदार फलंदाजीने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2022 मध्ये पहिला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने 51 रन्सची खेळी केली. या कामगिरीनंतर त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर सुर्यकुमार यादव म्हणाला, माझ्यासाठी शेवटपर्यंत खेळणं खूप महत्त्वाचं होतं. मात्र नंबर 3 वर माझं काम खेळाला पुढे घेऊन जाणं होतं, जिथे रोहित शर्मा सोडून गेला होता.
मात्र तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, त्यामुळे मी खूप खूश आहे. एक चांगलं वातावरण तयार होण्यासाठी एक मोठा विजय गरजेचा होता. आता आम्ही पुढच्या सामन्यांची वाट पाहतोय, असंही सुर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
सुर्यकुमारला कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते?
मी प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी करण्याचा आनंद घेतला आहे. पण मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडतं कारण मी माझ्या खेळीला त्यानुसार वेग देऊ शकतो, असं मत सुर्यकुमार यादवने व्यक्त केली आहे.