T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये पोहोचला असून सध्या वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसमध्ये आहे. मात्र यावेळी त्यांच्या टीम हॉटेलमध्ये हलाल मांस उपलब्ध नसल्याने खेळाडूंवर शेफ होण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तान खेळाडूंच्या आहारात हलाल मांस अनिवार्य असून, तेच उपलब्ध नसल्याने खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करणं किवा मग बाहेर जाऊन खाणं हे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते. भारतामध्ये चांगला पाहुणचार मिळालेल्या अफगाणिस्तान संघाला वेस्ट इंडिजमध्ये मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही खेळाडूंनी ही समस्या सोडवण्यासाठी प्रकरण आपल्याच हातात घेण्याचं ठरवलं.
भारतातील एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चांगल्या आदरातिथ्याचा अनुभव घेतल्यानंतर अफगाणिस्तान संघ T20 विश्वचषक 2024 साठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. तथापि, ब्रिजटाऊन हॉटेलमध्ये उपलब्ध असलेले मांस हलाल आहे की नाही याबद्दल अनिश्चितता होती. हलाल मांस कॅरिबियन बेटावर उपलब्ध आहे, परंतु सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये ते आहे की नाही हे निश्चित नाही.
"हलाल मांस आमच्या हॉटेलमध्ये उपलब्ध नाही. कधी कधी आम्ही स्वतः शिजवतो किंवा कधी बाहेर जातो. भारतात गेल्या विश्वचषकात, सर्वकाही परिपूर्ण होते. येथे हलाल गोमांस ही समस्या आहे. आमच्याकडे ते सेंट लुसियामध्ये होते. पण ते सर्व ठिकाणी नाही. एका मित्राने आमच्यासाठी याची व्यवस्था केली आणि आम्ही स्वतःच स्वयंपाक केला,” असं एका खेळाडूने पीटीआयला सांगितलं.
T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 चे वेळापत्रक संघांसाठी फारच तीव्र आहे. तीन वेगवेगळ्या देशात तीन सामने खेळावे लागत आहेत. प्रत्येक सामना जिंकण्याची गरज असताना संघांना प्रवास करताना अशा अडचणींचा सामना करावा लागणं दु:खद आहे.
अफगाणिस्तान संघाच्या आणखी एका सदस्याने कबूल केलं आहे की वेळापत्रकामुळे त्यांच्या तयारीवर परिणाम झाला. "विमानांची उड्डाणं आणि प्रशिक्षण वेळापत्रकांबाबत अनिश्चितता आहे. आम्हाला अनेकदा शेवटच्या क्षणी याबद्दल माहिती दिली जाते. लॉजिस्टिक आव्हानं असतानाही आयोजक सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत याची आम्हाला जाणीव आहे. कॅरिबियनमध्ये ही आव्हानं जास्त आहेत," असं तो म्हणाला.
बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर अफगाणिस्तानने सुपर 8 मधील पहिला सामना भारताविरुद्ध 47 धावांनी गमावला. 23 जून, रविवारी ऑस्ट्रेलियन संघाशी त्यांचा सामना होणार आहे.