टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अफलातून झेलची अद्यापही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अत्यंत कठीण झेल घेत अक्षरश: संघाच्या हातून निसटणारा विजय खेचून आणला. हार्दिक पांड्या अखेरची ओव्हर टाकत असताना डेव्हिड मिलरने पहिल्याच चेंडूवर हा फटका लगावला होता. हा चेंडू आता सीमा पार करत सिक्स जाणार असं वाटत असतानाच सूर्यकुमार यादवने झेल घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अखेरच्या चेंडूत 17 धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने लगावलेला चेंडू सिक्स गेला असता तर कदाचित भारताने वर्ल्डकप गमावला असता. डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा फलंदाज असल्याने त्याची विकेट महत्त्वाची होती.
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचं कौतुक होत असताना काहींनी मात्र त्याचा बूट सीमेला लागल्याचा दावा केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पॉलॉक याने मात्र हे फार मूर्खपणाचे दावे असल्याचं म्हटलं आहे. सूर्यकुमार यादवने केलेले प्रयत्न योग्य असल्याचं त्याने म्हटलं आहे.
या सर्व चर्चा सुरु असताना सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्याचा झेल एका नव्या अँगलने दिसत आहे. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव झेल घेण्यासाठी धावला तेव्हा रोहित शर्माची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे दिसत आहे.
Rohit Sharma brother literally lost all the hopes. Thank you Surya Dada. pic.twitter.com/iKRxJ0BHcl
(@LoyalSachinFan) July 2, 2024
दरम्यान सूर्यकुमार यादवने नुकतंच या झेलवर भाष्य केलं होतं. हा झेल घेताना आपण किती काळजी घेतली होती, पाय रेषेला लागू नये याची आपण खात्री केली होती याबद्दल सांगितलं. पण यादरम्यान त्याच्या मनात एक भीती होती.
"आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप सर यांनी सूर्यकुमार, विराट, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे नेहमीच महत्त्वाच्या ठिकाणी असायला हवेत. जिथे चेंडू जाण्याची जास्त शक्यता आहे असं सांगितलं होतं," असा खुलासा सूर्यकुमार यादवने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना केला होता.
या झेलबद्दल बोलताना सूर्यकुमार यादवने चेंडू पुन्हा मैदानात टाकताना आपण कशाप्रकारे पाय सीमेला लागू नये याची काळजी घेतली होती याबद्दल सांगितलं होतं. पण हा झेल होता याची आपल्याला पूर्ण खात्री होती असंही त्याने सांगितलं.
"जेव्हा मी चेंडू पुन्हा मैदानात टाकला आणि झेल घेतला तेव्हा मी सीमेला स्पर्श केला नाही याची खात्री होती. मी फक्त एकच गोष्ट नक्की करत होतो की जेव्हा मी चेंडूला आत ढकलले तेव्हा माझे पाय सीमेला स्पर्श करत नाहीत. मला माहित होते की तो एक योग्य झेल आहे. तिथे काहीही होऊ शकले असते. जर चेंडू षटकार गेला असता तर 5 चेंडूत 10 धावा असं समीकरण झालं असतं. आम्ही तरीही जिंकलो असतो, पण फार अटीतटीचं झालं असतं,” असं सूर्यकुमार यादवने ठामपणे सांगितलं.