मुंबई : टीम इंडिया Team India) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दरम्यान टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडंना संधी मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार या युवा संघाच्या नेतृत्वाची माळ ही गब्बर शिखर धवनच्या गळ्यात पडू शकते. क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
क्रिकबझनुसार,"श्रीलंका दौऱ्यासाठी धवनला नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. तसेच 2 भावांच्या जोड्यांनाही या दौऱ्यासाठी संधी देण्यात येणार आहे. निवड समिती हार्दिक आणि कृणाल पंड्या व्यतिरिक्त फास्टर बॉलर दीपक चाहर आणि लेग स्पीनर राहुल चाहरवर विश्वास दाखवू शकते". चाहर बंधूनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली होती. राहुलने 11 विकेट्स घेतल्या होत्या. यासह राहूल फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
देवदत्त पडीक्कल आणि नीतेश राणाला पदार्पणाची संधी
या दौऱ्यासाठी देवदत्त पडीक्कल आणि नीतेश राणा या आक्रमक फलंदाजांना पदार्पणाची संधी मिळू शकते. देवदत्तने विजय हजारे करंडकात झंझावाती खेळी केली होती. त्याने 7 मॅचमध्ये 147. 4 च्या एव्हरेजने 737 रन्स चोपल्या होत्या. यात त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं लगावले. तर त्यानंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 6 सामन्यात 152.34 स्ट्राईक रेटने 195 धावा केल्या. देवदत्तने यामध्ये 101 धावांची शतकी खेळीही केली होती.
तसेच कोलकाता नाईट रायडर्सच्या नीतेश राणानेही 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 201 धावा केल्या. या दमदार खेळीसह दोघांनी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यासह राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती या दोघांचा दौऱ्यासाठी समावेश केला जाऊ शकतो. याआधी दोन्ही खेळाडूंना फिटनेस टेस्टमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले होते
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत दाखल होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3 सामने खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 22, 24 आणि 27 जुलैला टी 20 मॅच खेळवल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सामन्यांचे आयोजन कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.
दरम्यान अजूनही बीसीसीआयकडून या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली नाहीये. मात्र या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनला नेतृत्वाची संधी मिळू शकते.
टीम इंडियाचा संभाव्य संघ
पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चहर.