Rahul Dravid Head Coach: सध्या टीम इंडियाच्या प्रमुख कोचची धुरा राहुल द्रविड यांच्याकडे आहे. मात्र राहुल द्रविड यांच्यानंतर टीमचे कोच कोण बनणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच नवीन मुख्य कोचसाठी जाहिरात जारी करणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खुलासा केलाय की, नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे. मात्र यानंतर ही कमान नव्या दिग्गजांकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, द्रविड पुन्हा प्रशिक्षक होऊ शकतो.
क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसारस जय शाह यांनी हेड कोचसंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. मात्र त्यांची इच्छा असल्यास ते या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. या बाबतीत ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. टीम इंडियाचे नवे कोचिंग स्टाफ जसं की, फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींग प्रशिक्षकाची निवड नवीन मुख्य प्रशिक्षकाशी चर्चा केल्यानंतर होणार आहे. केली जाईल. नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल हे सध्या तरी सांगता येणार नाही. तो भारतातील नसून दुसऱ्या देशातील देखील असण्याची शक्यता आहे.
असंही म्हटलं जातंय की, टीम इंडियामध्ये नवीन कोचिंग पॅटर्न लागू केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, बीसीसीआय प्रत्येक फॉरमॅटसाठी स्वतंत्र कोच ठेवण्याचा विचार करतोय. इंग्लंड टीममध्ये देखील ही पद्धत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डही हा नियम पाळतोय. त्यामुळे आता ही पद्धत टीम इंडियात येऊ शकते.
2021 मध्ये राहुल द्रविड यांना कोचपदासाठी धुरा सोपवण्यात आली होती. यानंतर 2023 मध्ये वर्ल्डकपच्या दरम्यान हा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र यानंतर त्याच्या कार्यकाळ वाढवण्यात आला होता. राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खूप चांगली कामगिरी करतेय. त्यामुळे आगामी काळात त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे.