पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय स्नूकर खेळाडू आणि एशियन अंडर-21 रौप्यपदक विजेता माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. माजीद अलीने पंजाबमधील फैसलाबाद येथील त्याच्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं. माजीद फक्त 28 वर्षांचा होता, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजीदने खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो नैराश्यात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीदने लाकूड कापण्याची मशीन वापरत आत्महत्या केली. माजीदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. तसंच राष्ट्रीय स्तरावर तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू होता.
दरम्यान, माजीदच्या निमित्ताने एका महिन्यात दोन स्नूकर खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्नूकर खेळाडू मोहम्मद बिलालचा ह्रदय बंद पडल्यामुळे मृत्यू झाला.
माजीदचा भाऊ उमरने दिलेल्या माहितीनुसार, तो तरुणपणापासूनच फार तणावात होता. त्याला याचा फार त्रास होऊ लागला होता. "आम्हाला फार धक्का बसला आहे. याचं कारण तो आपला जीव संपवेल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं," असं उमरने सांगितलं आहे.
पाकिस्तान बिलियर्ड्स आणि स्नूकरचे अध्यक्ष आलमगीर शेख यांनी माजिदच्या मृत्यूमुळे संपूर्ण समुदाय दु:खी झाला असल्याचं म्हटलं आहे. "त्याच्याकडे फार कौशल्य होतं. तरुण असल्याने तो पाकिस्तानला गौरव मिळवून देईल अशी अपेक्षा होती," असं ते म्हणाले आहेत.
माजीदला कोणतीही आर्थिक चणचण नव्हती असं आलमगीर शेख यांनी स्पष्ट केलं आहे. मोहम्मद युसूफ आणि मोहम्मद आसिफ यांसारख्या स्टार्सनी जागतिक आणि आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावल्यामुळे स्नूकर हा पाकिस्तानात हाय-प्रोफाइल खेळ बनला आहे. काही खेळाडूंनी व्यावसायिक सर्किटमध्ये पदवी प्राप्त केली आहे.