मुंबई: जगभरात कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थित विशेष काळजी घेऊन स्पर्धा होत आहे. काही ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नाही. तर दुसरीकडे क्रिकेटचे सामनेही सुरू आहेत. अशातच क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ISSF वर्ल्ड कप सुरू होण्याआधी प्रसिद्ध नेमबाज कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्तामुळे क्रिडा विश्वास खळबळ उडाली आहे. सध्या या नेमबाजावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नेमबाजाची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) सचिव राजीव भाटिया यांनी पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, नेमबाज खेळाडूची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या खेळाडूसोबत असलेल्या इतर खेळाडूंची चाचणी करण्यात आली.
दिलासादायक बाब म्हणजे इतर खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली आहे. या नेमबाजाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या खेळाडूमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. मात्र तरीही त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इतर नेमबाजांचा हा खेळाडू संपर्कात न आल्यानं धोका नाही असं सांगण्यात आलं आहे.