मुंबई : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या U19 World Cup final आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिमत फेरीमध्ये बांगलादेशने जेतेपद पटकावलं. या सामन्यात भारताला नमवल्यानंतर अखेरच्या क्षणी जी परिस्थिती ओढावली ते पाहता क्रिकेट विश्व आणि क्रीडारसिकांच्या वर्तुळातून खंत व्यक्त केली गेली. बांगलादेशच्या खेळाडूंचं गैरवर्तन आणि त्यावर भारतीय खेळाडूंकडून आलेली प्रतिक्रिया या सर्व धक्काबुक्कीच्या प्रकरणामध्ये आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीला हस्तक्षेप करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील Potchefstroom येथे पार पडलेल्या या सामन्याच्या शेवटी झालेला हा सर्व प्रकार पाहता आयसीसीकडून एकूण पाच खेळाडूंना दोषी ठरवण्यात आलं आहे. आयसीसीने आखलेला शिष्टाचार मोडल्याप्ररपणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ICC आयसीसीकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एम.डी. तौहीद हृदॉय, शामीम हुसैन, राकिबउल हसन या तीन बांगलादेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर, आकाश सिंह आणि रवी बिष्णोई या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंवर शिष्टाचारातील अनुच्छेद २.२१ तोडल्याचा ठप्पा लागला आहे. तर बिष्णोईवर अनुच्छेद २.५चं उल्लंघन केल्याचा दोष लावण्यात आला आहे. तेव्हा आता या खेळाडूंना आयसीसीच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
ICC: Three Bangladeshi players; Md Towhid Hridoy, Shamim Hossain, Rakibul Hasan, and two Indian players; Akash Singh and Ravi Bishnoi were charged with violating Article 2.21 of the code, whilst Bishnoi received a further charge of breaching Article 2.5. https://t.co/RIZ6i0chcg
— ANI (@ANI) February 10, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खेळाडूंवर करण्यात आलेल्या या कारवाईची नोंद ही त्यांच्या क्रिकेट कामगिरीवर परिणाम करणारीही ठरु शकते. दरम्यान, आयसीसीच्या नियमांची आणि आखून देण्यात आलेल्या शिष्टाचांराचं उल्लंघन केलं जाणं ही बाब खेदजनक असल्याची प्रतिक्रिया आता दिली जात आहे.
सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात विजयी धाव काढल्यानंतर जल्लोष करण्यासाठी बांगलादेशचे खेळाडू मैदानात पोहोचले. मैदानात येताच बांगलादेशचा एक खेळाडू भारतीय खेळाडूसमोर उभा राहिला. त्या खेळाडूने भडकाऊ वक्तव्यं केली, ज्यानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरु झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये होणारा हा वाद पाहता अखेर पंचांना या प्रकरणात मध्यस्तीसाठी पुढे यावं लागलं होतं.