न्यूयॉर्क : फोर्ब्सनं जगभरातल्या श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्सच्या या यादीमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली टॉप 100 खेळाडूंमध्ये आहे. या यादीमध्ये विराट कोहली हा एकटाच भारतीय आहे. फोर्ब्सच्या यादीत 83व्या क्रमांकावर असणारा विराट कोहली 2 कोटी 40 लाख डॉलर म्हणजेच 160 कोटी रुपयांपेक्षा जास्तची कमाई करतो. फोर्ब्सच्या यादीमध्ये जगभरातल्या एकाही महिला खेळाडूचा समावेश नाही. फोर्ब्सच्या यादीमध्ये अमेरिकेचा कुस्तीपटू फ्लायड मेवेदर पहिल्या क्रमांकावर आहे. मेवेदरची मागच्या वर्षाची कमाई 25 कोटी 50 लाख डॉलर होती.
फोर्ब्सनं दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीची सर्वाधिक कमाई क्रिकेट पीचबाहेरची आहे. कोहली हा प्युमा, पेप्सी, ओकले यासारख्या बड्या ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये एनबीएच्या 40 खेळाडूंचा समावेश आहे. सात वर्षांमध्ये मेवेदर चार वेळा पहिल्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या या यादीतून महिला खेळाडू गायब आहेत. महिला टेनिसपटू लि ना, मारिया शारापोआ आणि सेरेना विलियम्स या यादीमध्ये होत्या. पण लिनं 2014 साली निवृत्ती घेतली. तर शारापोवा डोपिंग प्रकरणातील 15 महिन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करत आहे. सेरेना विलियम्सही सप्टेंबरमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे, असं फोर्ब्सकडून सांगण्यात आलं.
अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर, टेनिसपटू रॉजर फेडरर सातव्या क्रमांकावर, गोल्फर टायगर वूड्स 16व्या, टेनिसपटू रफेल नडाल 20व्या आणि गोल्फर रोरी मॅकलरोय 26व्या क्रमांकावर आहे. टॉप 100 खेळाडूंमध्ये 22 देशांचे खेळाडू आहेत. यातले 66 खेळाडू अमेरिकेचे आहेत. बेसबॉल, बास्टेकबॉल, फूटबॉलचे 72 खेळाडू या यादीमध्ये आहेत.