Ambati Rayudu Wife Threat: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबती रायडूच्या मित्राने रायडूच्या पत्नीला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. अंबती रायडूने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसंदर्भात इंडियन प्रिमिअर लीगचा चषक कोलकाता नाईड रायडर्सने जिंकल्यानंतर केलेल्या कमेंट्समुळे या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा रायडूच्या मित्राने केला आहे. रायडूने 26 मे रोजीच्या आयपीएल 2024 च्या फायनलनंतर बोलताना, ऑरेंज कॅप मिळाल्याने तुमचा संघ जिंकेल याची काही शाश्वती नसते, असा टोला लगावला होता.
2024 च्या संपूर्ण पर्वामध्ये रायडूने अनेकदा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेकडे पाहण्याचा आरसीबीचा दृष्टीकोन चुकतोय असं रायडूने आवर्जून सांगितलं. मात्र या टीकेवरुन आता रायडूवरच टीका होताना दिसत आहे. रायडूचा मित्र सॅम पॉलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. रायडू आणि त्याच्या पत्नीला असंख्य धमक्या मिळत असल्याचा दावा पॉलने केला आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पॉलने, "कालपर्यंत आम्ही यावर हसत होतो. मात्र रायडूची पत्नी विद्याने मला सांगितली की, केवळ शिव्या दिल्या जात नव्हत्या तर खासगी स्तरावर जाऊन अश्लील वक्तव्य केली गेली. आमच्या मुलांवर बलात्कार करण्याची धमक्याही देण्यात आल्या. आमची मोठी मुलगी केवळ 4 तर छोटी अवघ्या एका वर्षाची आहे. अशाप्रकारची प्रसिद्धी मिळाल्यानंतर अशा धमक्या मिळतात असं मला वाटलेलं. आपण याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. त्याच्या पत्नीलाही धमकावण्यात आलं आणि तिच्याविरुद्ध अश्लील विधान करण्यात आली," असा दावा केला आहे.
"मात्र हा काही विनोद नाही. त्याने त्याचं मत मांडलं. असं असताना गुन्हेगारांना एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची मूभा कशी मिळते. अशाप्रकारे धमकावणे, मारुन टाकण्याच्या धमक्या देणं, 1 आणि 4 वर्षांच्या मुलींवर बलात्काराच्या धमक्या देणं हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. संविधाने आपल्याला व्यक्त होण्याच्या हक्क दिला आहे," असंही पॉल म्हणाला आहे.
"मला अपेक्षा आहे की न्याय यंत्रणा ज्यामध्ये पोलीस आणि न्यायालयांचा समावेश होतो ते या गोष्टीचा दखल घेतील आणि धमकावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करतील. अगदी अशा गोष्टींना पाठींबा देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींविरोधातही कारवाई केली पाहिजे," अशी इच्छा पॉलने व्यक्त केली आहे.