मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र भारताचा फलंदाज अंबाती रायडू इंग्लड दौऱ्यातून बाहेर जाऊ शकतो. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी यो-यो टेस्ट पास केलीये. इंग्लंड जाणाऱ्या टीममधील केवळ रायडू आहे जो या टेस्टमध्ये पास होऊ शकला नाहीये. त्याचा स्कोर १६.१हून कमी होता. रायडू संघातून बाहेर होऊ शकतो.
रायडूने दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. आयपीएल २०१८मध्ये चेन्नईच्या अंबाती रायडूने ६०२ धावा केल्या होत्या. इंग्लंडला जाणाऱ्या संघाला शुक्रवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बोलावण्यात आले होते. यात कोहली, धोनी आणि भुवनेश्वर कुमारची यो-यो टेस्ट झाली. कोहली, धोनी, भुवनेश्वर, केदार जाधव आणि सुरेश रैनाने ही टेस्ट पास केली.
यानंतर जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल आणि मनीष पांडे टेस्टसाठी गेलेत. भारतीय संघ २७ आणि २९ जूनला आयर्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळणार आहे.