माउंट मोनगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं वनडे सीरिज ३-०नं खिशात टाकली आहे. ही मॅच विराट कोहलीची या दौऱ्यातली शेवटची मॅच होती. उरलेल्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्याऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व असेल. पण विराटच्या अनुपस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण याचं उत्तर खुद्द विराट कोहलीनंच दिलं आहे. मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटनं तिसऱ्या क्रमांकवर शुभमन गिल खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत.
शुभमन गिलला नेटमध्ये सराव करताना मी पाहिलं आहे. त्याला पाहून मी हैराण झालो. १९ वर्षांचा असताना मी त्याच्या १० टक्केही नव्हतो, अशी कबुली विराटनं दिली आहे. असाधारण प्रतिभा असलेले खेळाडू समोर येत आहेत. पृथ्वी शॉनंही दिलेल्या संधीचा फायदा उठवल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली.
शुभमन गिलविषयी बोलताना कोहली म्हणाला 'त्याच्यामध्ये असाच आत्मविश्वास राहिला आणि त्याच्या खेळाचा स्तर सुधारला, तर ते भारतीय क्रिकेटसाठी चांगलं असेल. टीममध्ये येणारे खेळाडू प्रभाव पाडतात, त्यांना संधी देताना आणि विकसित व्हायला मदत करताना खुशी होते.'
शुभमन गिल हा मागच्या वर्षी झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा हिस्सा होता. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना तब्बल ४१८ रन केल्या होत्या. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही त्याची निवड करण्यात आली होती.
माऊंट मॉनगनुईच्या बे ओव्हल मैदानात झालेल्या या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये ३-०ची विजयी आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतानं सुरुवातीपासूनच धक्के दिले. त्यामुळे न्यूझीलंडची टीम २४३ रनवर ऑल आऊट झाली. रॉस टेलर आणि टॉम लेथमनं न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. रॉस टेलर ९३ रनवर तर टॉम लेथम ५१ रनवर आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं.
२४४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ६२ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीनं ६० धावांची खेळी केली. शिखर धवन २८ रनवर आऊट झाला. अंबाती रायुडू ४० रनवर नाबाद आणि दिनेश कार्तिक ३८ रनवर नाबाद राहिला. न्यूझीलंड दौऱ्यातील कर्णधार विराट कोहलीची ही शेवटची मॅच होती. विराटच्या जागी आता शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करेल. लागोपाठ क्रिकेट खेळत असल्यामुळे विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय टीम प्रशासनानं घेतला आहे.