कॅप्टन कोहलीची 'विराट' उडी

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कारकिर्दीतली २४३ रन्सची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठी उडी घेतली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 7, 2017, 08:46 PM IST
कॅप्टन कोहलीची 'विराट' उडी  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कारकिर्दीतली २४३ रन्सची सर्वोत्तम खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठी उडी घेतली आहे. आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. २४३ रन्सच्या या खेळीनंतर विराटनं दुसऱ्या इनिंगमध्ये ५० रन्स केल्या. या सीरिजमध्ये विराटनं ६१० रन्स केल्या. भारतानं ही सीरिज १-०नं जिंकली.

कोहलीनं या सीरिजमध्ये लागोपाठ दोन द्विशतकं केली आणि लागोपाठ तीन मॅचमध्ये शतकी खेळी केली. सीरिज सुरु होण्याआधी कोहली आयसीसी टेस्ट क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर होता. पण या सीरिजमध्ये १५२.५० च्या सरासरीनं खेळल्यामुळे कोहलीनं डेव्हिड वॉर्नर, चेतेश्वर पुजारा, केन विलियमसन आणि जो रुटला मागे टाकलं आहे.

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कोहली आणि स्मिथमध्ये ४५ पॉईंट्सचा फरक आहे. वनडे आणि टी-20मध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

अन्य भारतीय खेळाडूंचाही फायदा 

भारताचा ओपनर मुरली विजयला ३ स्थानांचा फायदा होऊन तो २५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मानं ६ स्थानांची उडी मारली असून तो ४०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पुजाराची घसरण

पुजाराची मात्र क्रमवारीमध्ये दोन स्थानांची घसरण होऊन तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर बॉलर्सच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विन चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये जडेजा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे तर अश्विनची एका स्थानानं घसरण होऊन तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारत पहिल्या क्रमांकावर पण...

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम असला तरी एका अंकाची घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेची टीम ९४ अंकासोबत सहाव्या क्रमांकावर कायम आहे.