मुंबई : क्रिकेट मॅचदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेडियमबाहेर असलेल्या सुरक्षा यंत्रणांकडून चोख काळजी घेतली जाते. टीमनं खराब कामगिरी केली तर प्रेक्षकांकडून खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या किंवा बूट फेकण्यात येतात. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईत झालेल्या मॅचवेळीही अशाचप्रकारे खेळाडूंवर बूट फेकण्यात आले होते. या प्रकारामुळे चेन्नईमध्ये होणारे आयपीएलचे सामने पुण्यात हलवण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचवेळीही काही नियम बनवण्यात आले आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये जाताना प्रेक्षकांना नाणी घेऊन जाता येत नाही. कोणताही प्रेक्षक नाणी घेऊन आला तर त्याला ही नाणी बाहेर ठेवावी लागतात. वानखेडे स्टेडियमच्या गेट्सबाहेर ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये ही नाणी जमा करावी लागतात.
मॅचवेळी जमा झालेल्या या नाण्यांचं नंतर काय होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) माहिती दिली आहे. पेटीमध्ये जमा झालेली सगळी नाणी एमसीएकडून जवळच्या मंदिरांना दान म्हणून दिली जातात. मि़ड-डे या वृत्तपत्रानं याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. नाण्यांच्या या पेट्या आम्ही उघडत नाही. एक किंवा दोन मॅचनंतर आम्ही या पेट्या मंदिरात घेऊन जातो. या पैशांशी आमचा काहीही संबंध नसल्यामुळे आम्ही ते मंदिरात दान करतो, असं एमसीए पदाधिकाऱ्यानं मि़ड-डेला सांगितलं. मुंबईतल्या एका मॅचवेळी जवळपास दोन हजार रुपयांची नाणी जमा होतात.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईनं ७ मॅच खेळल्या. तर क्वालिफायर-१ची चेन्नई आणि हैदराबादची मॅचही मुंबईत झाली. या मॅचमध्ये विजय झाल्यामुळे चेन्नईची टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. एलिमिनेटर मॅचमध्ये कोलकात्यानं पराभव केल्यामुळे राजस्थानची टीम बाहेर गेली आहे. आता हैदराबाद आणि कोलकात्यामध्ये २५ मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात क्वालिफायर-२ची मॅच होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ते चेन्नईसोबत आयपीएलची फायनल खेळतील. रविवारी २७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलची फायनल खेळवण्यात येणार आहे.