मँचेस्टर : सेमी फायनलच्या अटीतटीच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून अवघ्या १८ रनने पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पराभवानंतर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला की, 'या वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून आम्ही चांगली कामगिरी केली. परंतु सेमीफायनलच्या या मॅचमधील सुरुवातीची ४५ मिनीटं आमच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. हे फार वाईट आहे. आम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने फटके मारले'.
या मॅचमध्ये ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने मारलेल्या बेजबाबदार फटक्यांवरही आता टीका होत आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था अत्यंत खराब झाली. टीम इंडियाचे पहिले ३ खेळाडू रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे तिघे सातत्याने चांगली कामगिरी करत होते. पण सेमी फायनलमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी खेळी या तिघांना करण्यास अपयश आले. या तिन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्ध नकोसा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे तिघे न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी १ रन करुन माघारी परतले. त्यामुळे वनडे क्रिकेट इतिहासात पहिले ३ खेळाडू प्रत्येकी १ रनवर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
टीम इंडियाचा २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये देखील सेमीफायनल मॅचमध्ये पराभव झाला होता. ही मॅच टीम इंडियाने ९५ रनने गमावली होती. तर न्यूझीलंडनेही २०१५ वर्ल्ड कपची परंपरा कायम ठेवली. २०१५ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.