लंडन : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला सामना रंगेल. पण या मॅचआधीच दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा धक्का लागला आहे. फास्ट बॉलर डेल स्टेनला पहिल्या मॅचला मुकावं लागणार आहे. टेस्ट क्रिकेटमधल्या दक्षिण आफ्रिकेच्या सगळ्यात यशस्वी बॉलर असलेल्या डेल स्टेनला आयपीएल खेळताना खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून स्टेन अजूनही सावरलेला नाही.
डेल स्टेनला खांद्याच्या दुखापतीतून फिट होण्याच्या मार्गावर आहे, असं दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिबसन म्हणाले. रविवारी बांगलादेशविरुद्ध किंवा ५ जूनला भारताविरुद्धच्या मॅचवेळी स्टेन फिट होईल, अशी अपेक्षा गिबसन यांनी व्यक्त केली आहे. स्टेन अजूनही पूर्ण फिट झालेला नाही. ६ आठवड्यांच्या या स्पर्धेमध्ये कोणतीही घाई करण्याची गरज नसल्याचं गिबसन यांनी सांगितलं.
३५ वर्षांच्या डेल स्टेनने टेस्ट क्रिकेटमध्ये ४३९ विकेट तर वनडेमध्ये १९६ विकेट घेतल्या आहेत. सराव करताना डेल स्टेनने जॉगिंग आणि कमी रन अप घेऊन बॉलिंग केली. यानंतर तो मैदानातून बाहेर गेला आणि परत येऊन बॅटिंग केली.