मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम वनडे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. ही वनडे सीरिजमध्ये वर्ल्ड कपआधीची भारतीय टीमची तयारी म्हणून पाहिली जात आहे. वर्ल्ड कपआधी भारत आता फक्त ११ मॅच खेळणार आहे. यातल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ आणि न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० अशा मॅच भारत खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातली पहिली वनडे १२ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. तर वर्ल्ड कप ३० मेपासून सुरु होणार आहे. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपसाठी टीमच्या आवडत्या स्पिनरचा खुलासा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताकडून अश्विन, जडेजा आणि कुलदीप यादव खेळले. या सगळ्यांमध्ये कुलदीप यादव सगळ्यात जास्त प्रभावी होता. कुलदीपनं चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे रवी शास्त्रींनी कुलदीपचं कौतुक केलं आहे. कुलदीपची ऑस्ट्रेलियातली कामगिरी बघता तोच वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची पहिली पसंती असेल, असं शास्त्री म्हणाले.
वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये कुलदीप यादव पहिल्या ११ खेळाडूंमध्ये असेल. मनगटानं बॉल स्पिन करण्याचा फायदा कुलदीप यादवला नक्की मिळेल. त्यामुळे बोटांनी स्पिन करणाऱ्या जडेजा आणि अश्विनपैकी एकाची गरज भासेल, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.
टेस्ट सीरिजमध्ये विकेट कीपर ऋषभ पंतनं ३५० रन केले. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असं असलं तरी पंतची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी निवड झालेली नाही. याबद्दलही शास्त्रींनी भाष्य केलं आहे. ऋषभ पंतला मॅच संपवण्याची कला शिकण्याचं विशेष काम देण्यात आलं आहे. यानंतर त्याला टीममध्ये घेतलं जाईल. वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
ऋषभ पंत हा सारखा क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे आम्ही त्याला परत पाठवलं आहे. दोन आठवड्यांची विश्रांती घेऊन पंत पुन्हा एकदा भारत ए टीममध्ये जाईल, असं शास्त्री म्हणाले. भारतीय टीमवर टीका करणाऱ्यांनाही शास्त्रींनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं काय म्हणतात याची कोण परवा करतं? स्कोअरबोर्ड बघा, निकाल बघा बाकी सगळा इतिहास आहे, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.